File Photo : Baramati News
उरुळी कांचन : बऱ्याच दिवसापासून होणार होणार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात गाजलेले उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन अखेर शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन व लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारित गेल्यानंतर, उरुळी कांचन पर्यंतची हद्द शहर पोलिसांच्या ताब्यात गेली होती. मात्र शहर पोलिसांचा कारभार व ग्रामीण पोलिसांचा कारभार यांच्यामधील कामाची पद्धत वेगळी असल्यामुळे, ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण पोलिसांची जी सवय झाली होती, त्या अनुषंगाने या भागातील नागरिक उरुळी कांचन चे पोलीस स्टेशन मंजूर करून ते ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित रहावे अशी मागणी करीत होते. शासनाने ही मागणी मान्य करून उरुळी कांचन पोलीस स्टेशन ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित राहील अशी घोषणा केली.या बाबीला मान्यता देऊन सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटला असतानाही ते पोलीस स्टेशन सुरू होत नव्हते, म्हणून याबाबत सातत्याने शंका व्यक्त होत्या. मात्र या सर्वांवर आज पडदा पडला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित उरुळी कांचन पोलीस स्टेशन उद्यापासून सुरू होत असून, या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परिसरातील दहा गावे कार्यरत राहतील. या पोलीस स्टेशनचे प्रथम प्रभारी अधिकारी म्हणून भोर येथील शंकर पाटील यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशनला सध्या एक वरिष्ठ पी.आय. दोन पी.एस.आय. व ३२ पोलीस कर्मचारी असे एकूण ३५ कर्मचारी मनुष्यबळ मंजूर करून दिले आहे अशी माहिती आनंद भोईटे यांनी दिली.