उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुख यांच्यात प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर प्रचंड वादावादी झाली.
निर्णय काहीच नाही
संस्थांच्या विश्वस्तांच्या आडमुठेपणामुळे पालखी सोहळा परंपरेनुसार गावातील श्रीकाळभैरवनाथ मंदिरात दुपारच्या विसाव्यासाठी येणार नाही या संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे सोहळा प्रमुख यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध करत पालखी सोहळा गावातून मंदिर मार्गे महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर विसाव्यासाठी थांबवावा अशी भूमिका घेतली जर तो पर्याय मान्य नसेल तर पालखी सोहळा उरुळी कांचन मार्गे नेवू नका कोठून दुसरीकडून न्याह्यचा तिकडून न्या असा सज्जड दम सरपंच राजेंद्र ब.कांचन, माजी सरपंच संतोष ह. कांचन, दत्तात्रय शां.कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ल. कांचन, अमित कांचन,सुनील तांबे, मिलिंद जगताप, शंकर बडेकर यांच्यासह प्रसाद कांचन,आबासाहेब चव्हाण,सागर पांगरे,अभिषेक कांचन आदी ग्रामस्थांनी दिला. हा वाद मिटविण्यासाठी आज हवेलीचे प्रांत संजय आसवले यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी आणि उरुळी कांचन ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक त्यांच्या कार्यालयात बोलावली होती, मात्र या बैठकीत प्रचंड गोंधळ होण्याने निर्णय अनिर्णित राहिला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी १० जून ते २८ जून यादरम्यान चा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये उरुळी कांचन चा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल असे जाहीर केल्याने उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी वैष्णवांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन , जे. बी. सराफ, लक्ष्मण जगताप,एकनाथ चौधरी, सुनील जगताप यांनी विश्वस्तां समोर गावाच्या धार्मिक, सांप्रदायिक व भावनिक अस्मितेला तडा जावू न देता पारंपारिक पिढीजात परंपरेनुसार पालखी सोहळा गावातील मंदिरात विसाव्याला आणावा अशी विनंती केली पण सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी पालखी सोहळा गावात येणार नाही या मुद्यावर अडून बसल्याने हा इशारा देण्यात आला. यावर प्रांत अधिकारी संजय आसवले यांनी दोन्ही बाजूनी सामंजस्याची भूमिका घेवून हा वाद मिटवावा अशी भूमिका मांडली. यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते, त्यांनी दोन दिवसात प्रांत साहेबांकडे निर्णय कळवतो असे यावेळी सांगितले.
काही ग्रामस्थांनीही संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांशी संपर्क करुन गेल्या सुमारे अडीचशे तीनशे वर्षांपासूनची परंपरा मोडू नये अशी विनंती केली आहे, उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदारांना निवेदन देऊन नेहमीच्या प्रथा परंपरेनुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरातच घ्यावा अशी मागणी केलेली आहे, पालखी सोहळा प्रमुखांनी गावाच्या भावनांचा आदर करून योग्य निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Uruli kanchankar aggressive for palkhi sohala argument between the villagers and the head of the palanquin ceremony nrab