नांदेड-पुणे मार्गावर 'वंदे भारत' धावणार; 550 किमीचा प्रवास केवळ 7 तासांत करता येणार
नांदेड : देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरून वंदे भारत रेल्वे धावत आहेत. त्यातच नांदेडहून पुण्याला धावणारी दुसरी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 7 तासांवर येणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२६ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.
सध्या नांदेड ते पुणे हे ५५० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल १० ते १२ तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, या नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ आणि खर्च वाचणार आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डुवाडी, दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर या एक्सप्रेसचे थांबे असतील. या मार्गावर शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीसाठी पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या मर्यादित रेल्वे सेवा असल्यामुळे प्रवाशांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो, जो वेळखाऊ आणि खर्चिक ठरतो. वंदे भारत सुरू झाल्यानंतर दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
दरम्यान, या मार्गासाठी एसी चेअर कारचे तिकीट दर १५०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. आठवड्यातून पाच ते सहा वेळा ही एक्सप्रेस धावेल, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तिकीट दर आणि अधिकृत वेळापत्रक लवकरच रेल्वे विभागाकडून जाहीर केले जाणार आहे.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणखी जवळ येणार
वंदे भारत एक्सप्रेस तिच्या वेग, आरामदायी प्रवास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. आता ही सुविधा नांदेड-पुणे मार्गावर उपलब्ध होणार असल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणखी जवळ येणार आहेत.
अनेक विकासकामांना सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना सुरुवात केली जात आहे. त्यातच भारतात ‘वंदे भारत’ रेल्वे पसंतीस उतरली आहे. अनेक मार्गांवर या गाड्या धावत आहेत. असे असताना आज काशीमधून चार ‘वंदे भारत’ गाड्या सुटणार आहेत. याला पंतप्रधान मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील. मुख्यमंत्री योगी त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती दिली जात आहे.
हेदेखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर; चार ‘वंदे भारत’ गाड्यांना दाखवणार ‘हिरवा झेंडा’






