स्वारगेट छेडछाड प्रकरणाविरोधात ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी तीव्र आंदोलन केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत माेरे यांच्याकडे सुमारे ४ काेटी १६ लाख रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर साडे तीन काेटी रुपयांचे कर्जही असल्याची माहीती प्रतिज्ञापत्रातून समाेर आली आहे. मनसेला रामराम ठोकून वंचित आघाडीकडून वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी शुक्रवारी (दि.१९) उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे ज्यामधून त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.
मोरे यांच्याकडे अलिशान गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. त्यांच्याकडे चार कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर वसंत मोरे यांच्यावर तीन कोटी ४९ लाख २३ हजार ४३९ रुपयांचे, पत्नीवर ८ लाख ८९ हजारांचे आणि मुलगा रुपेश मोरेवर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे.
मोरेंचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, त्यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या चारचाकी गाड्यांचा ताफा; बुलेटसह सहा दुचाकी आणि एक ट्रक आहे. सोबतच त्यांच्याकडे ७० ग्रॅम आणि पत्नीकडे २७० ग्रॅम सोने आहे.
‘मी मनसेत शुन्यापासून सुरुवात केली. आताही वंचित बहुजन आघाडीत शुन्यापासून सुरुवात करतोय. मी कायम माझा फ्लॅट विकून निवडणूक लढलो पण मला वंचितने निवडणूक लढायला पैसे दिले, असे मोरे यावेळी म्हणाले.
यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य
सोशल मिडीयावर चर्चेत असलेले मनसेचे माजी नगरसेवक आणि पुणे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी शुक्रवारी कोणताही गाजावाजा न करता अर्ज दाखल केला. एरव्ही अगदी छोट्यात छोटी घटना सोशल मिडीयावर प्रसिद्ध करणार्या मोरे यांनी कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकिय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.