वाई तालुक्यात FDAच्या कारवायांचा दिखावा की खरोखरची धडक मोहीम? जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह! (AI Generated image)
वाई – वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांबाबत सध्या नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वाईच्या पश्चिम भागात दुग्ध व्यवसाय आणि वाहतुकीशी संबंधित काही कारवाया करण्यात आल्याचे चित्र समोर आले असले, तरी तालुक्यातील इतर भागांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध प्रकारांवर प्रशासनाची नजर कधी पडणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून किरकोळ व्यावसायिक, टपरीचालक किंवा छोट्या व्यवसायांवर कारवाई होताना दिसते; मात्र शहरातील आणि तालुक्यातील मोठ्या व्यावसायिक आस्थापनांवर, खाद्यपदार्थांच्या व्यवसायांवर तसेच कथित भेसळीच्या प्रकारांवर तितक्याच तीव्रतेने कारवाई का होत नाही, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
विशेषतः वाई शहर आणि तालुक्यातील अनेक किरकोळ टपऱ्यांवर आजही गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. शासनाने गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर बंदी घातलेली असताना त्याची विक्री नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? या विक्रीला आळा घालण्यात अन्न व औषध प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू असल्याचे चित्र असताना, सातारा जिल्ह्यात आणि विशेषतः वाई तालुक्यात प्रशासनाची कारवाई अपेक्षेइतकी प्रभावी का दिसत नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. गुटख्याची विक्री थांबवणार कधी? किरकोळ टपऱ्यांपासून मोठ्या व्यावसायिक केंद्रांपर्यंत गुटख्याची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्यपूर्ण आणि ठोस कारवाईची अपेक्षा आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गुटख्यामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याने, केवळ अधूनमधून कारवाई करण्याऐवजी विक्रीची संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात …
वाई शहर आणि तालुक्यात विविध खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जाचे साहित्य तसेच एकाच तेलात वारंवार पदार्थ तळण्याच्या प्रकारांवर प्रशासनाचे किती नियंत्रण आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर विषयावर नियमित तपासणी आणि कठोर कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आपल्या टपरीवर किंवा छोट्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य व्यावसायिकांवर कारवाई करणे प्रशासनाला सोपे जाते; मात्र मोठ्या आस्थापनांवर, मोठ्या व्यावसायिकांवर आणि प्रभावशाली घटकांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने केलेल्या कारवायांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी तपासणी करण्यात आली? किती नमुने घेतले? किती प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले? किती जणांवर दंडात्मक कारवाई झाली? तसेच मोठ्या व्यावसायिक आस्थापनांची किती तपासणी करण्यात आली? याची सविस्तर माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणीही होत आहे.
Satara News: सातारा पालिकेत राजकीय घडामोडी! उदयनराजे समर्थक …
कारवाईपूर्वीच फोनाफोनी’च्या चर्चेला प्रशासनाने उत्तर द्यावे! वाई तालुक्यात काही ठिकाणी कारवाई होण्यापूर्वीच संबंधित व्यावसायिकांना माहिती मिळते आणि त्यामुळे कारवाई टाळली जाते, अशा चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यात कथित जवळीक असल्यामुळे काही ठिकाणी कारवाई होत नसल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र या चर्चांना कोणताही अधिकृत दुजोरा नसून, प्रशासनाने याबाबत पारदर्शकता ठेवून नागरिकांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे.
जर या चर्चांमध्ये तथ्य नसेल, तर अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडून या सर्व आरोपांना पूर्णविराम द्यावा. आणि जर कुठे गैरप्रकार आढळत असतील, तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाई शहर आणि तालुक्यात काही किरकोळ कारवाया करून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा आकडेवारी वाढवण्यासाठी कारवाई न करता, अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मोठ्या प्रश्नांवर प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह …
वाई तालुक्यातील जनतेला आता केवळ कारवाईचे फोटो नकोत, तर परिणामकारक आणि सातत्यपूर्ण कारवाई हवी आहे. प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणारे, खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे मोठे व्यावसायिक असोत किंवा छोटे विक्रेते कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असली पाहिजे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने वाई तालुक्यातील कारवायांचा संपूर्ण तपशील जाहीर करून, गुटखा विक्री, खाद्यपदार्थांची भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि खाद्यतेलाचा वारंवार वापर यावर नेमक्या किती कारवाया केल्या, याचे उत्तर जनतेला द्यावे. तसेच मोठ्या व्यावसायिक आस्थापनांवर भविष्यात कोणती कारवाई केली जाणार, याबाबतही प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
सर्वसामान्यांवरच कारवाईचा बडगा आणि मोठ्यांना मोकळे रान अशी जनतेची भावना निर्माण होत असेल, तर ही परिस्थिती प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. आता अन्न व औषध प्रशासन या प्रश्नांची उत्तरे देणार का आणि वाई तालुक्यातील नागरिकांच्या मनातील संशय दूर करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






