मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ, असं सेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले ?
‘आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ. आम्ही मनापासून प्रेम करणारे आहोत. जो लढा कोकणात उभा केला, तोच लढा मुंबई उभा करू शकतो. कोकणी माणसांनी शिवसेना उभी केली आहे, असा इशाराही केसरकरांनी दिला. ‘आम्ही आमचा गट तयार केला आहे. पुढचा निर्णय काय करायचा हे अजून ठरलं नाही. तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहात, त्याच लोकांनी शिवसेना उभी केली, त्यांनी रक्त आटवलं आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकलं आहे. एकीकडे लोकांना बोलण्यासाठी पाठवलं आणि दुसरीकडे गटनेतेपदावरून काढून टाकलं. हे चुकीचे आहे. अगदी त्यांचं ऐकून घ्या, मग कारवाई करा. पण, असं झालं नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, चौपाटी ही राज्याचा मुख्यमंत्री ठरवत नाही. मुख्यमंत्री हे नरिमन पॉईंटमधील विधीमंडळात ठरत असतो, जनता ठरवत असते. ते पवित्र असे व्यासपीठ आहे. त्यांनी एक आमदाराला जनावराची उपमा दिली. महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले. महिन्यापूर्वीच तुम्हाला आमदारांनी निवडून आणलं. कुठल्या तरी माणसाच्या मनात वेदना निर्माण होते. त्यामुळे वाद निर्माण होते, राज्यात दंगली निर्माण होतात. जर उद्या आमदारांच्या घरांवर हल्ले होत राहिले आणि राष्ट्रपती राजवट जर लागली तर तुम्ही काय करणार. तुम्ही ती परिस्थिती आणताय. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशाराच केसरकर यांनी दिला.
50 लोक सांगत असताना निर्णय घ्यावा लागेल
‘भाजप आणि सेनेनं एकत्र निवडणूक लढली. त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला आणि बाहेर पडले. त्यावेळी भाजप काय रस्त्यावर उतरली का, पोस्टर जाळले का, त्यांनी असं काही न करता निर्णय स्विकारला. तुम्हालाही निर्णय स्विकारावा लागेल, असा सल्लावजा टोलाही केसरकर यांनी शिवसेनेला दिला. तसेच ‘या पेक्षा वाईट परिस्थिती कोकणामध्ये होती. त्यामध्ये मी लढा दिला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे. आमदारांना एकीकडे बोलवायचे आणि दुसरीकडे कारवाईचा इशारा द्यायचा, हे योग्य नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक हे लोकांची काम करायचे. 90 टक्के समाजकारण करत होते. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा वेगळा चेहरा समोर आणला. त्यांचा चेहरा हा कायम राहिला पाहिजे. पण, आम्ही दीड वर्षांपासून त्यांना सांगत आहे. जेव्हा 50 लोक सांगत असताना निर्णय घ्यावा लागेल, असंही केसरकर म्हणाले.
[read_also content=”राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नवनीत राणांना मिटकरींचे सणसणीत उत्तर, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/mitkaris-scathing-reply-to-navneet-rana-demanding-presidents-rule-said-nrdm-296982.html”]
केसरकरांना भाजपनी ऑफर
केसरकर यांनी भाजप प्रवेशाबाबत एक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ‘मी शिवसेनेवर प्रेम केलं आहे. मला त्यावेळी भाजपने ऑफर दिली होती. गोव्याच्या विधानसभेत बसण्याचे सांगितले होते. पंतप्रधान कार्यालयातून बोलावणं आलं होतं. त्यावेळच्या संरक्षणमंत्र्यांनीच मला दिल्लीला घेऊन गेले होते. त्यावेळी शिवसेना हा गरिबांचा पक्ष असल्याचे सांगितलं होतं. त्यामुळे सेनेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासाही केसरकर यांनी केला आहे.