राज्यसभा (Rajyasabha) निवडणुकीसाठीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे छोट्या पक्षांसह अपक्ष आमदारांचाही भाव वधारला आहे. यात आता मनसे(MNS)चे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) हेदेखील आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी चर्चा करून भाजप(BJP)ला मत जाणार की ठाण्यातील नेत्यांच्या गळाला लावणार, याबाबत चर्चा आहे. दरम्यान, आमदार राजू पाटील हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा उचल्याने भाजप नेत्यांशी त्यांची जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थन केल्याचे समोर आले होते. तसेच, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही पाटील यांचे चांगले संबंध आहेत. मात्र, कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर विरोधक मानले जातात.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजप आणि मनसेला खिंडार पाडले आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक जवळ आल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी असून भाजपला सदर एक मत मिळू शकते. मात्र, मनसेने अद्याप याविषयी भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार पाटील हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.