फोटो सौजन्य: अंकुश चौधरी इन्स्टाग्राम
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये अंकुश चौधरीचा कायमच समावेश केला जातो. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलयं. नुकताच अंकुश चौधरीचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी तीन चित्रपटांची घोषणा करण्यात आली. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अंकुशने महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अंकुश चौधरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्याने अशोक सराफांबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दिसण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना खुशी कपूरने सुनावले खडेबोल, नेमकं अभिनेत्री काय म्हणाली ?
अंकुश चौधरीने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या सेटवरील आणि इतर काही जुन्या चित्रपटातील काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की,
“‘अशोक सराफ’ हे नाव आमच्या संपूर्ण पिढीच्या आठवणींशी जोडलेलं आहे. त्यांच्या सिनेमांचे ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघणं हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. त्यांच्या विनोदी टाइमिंगवर फिदा होणाऱ्या लाखो प्रेक्षकांमध्ये मीही होतो आणि आजही आहे. त्यांचे डायलॉग्स, त्यांची स्टाईल, अभिनयातली सहजता, त्यातील बारकावे पाहिले, की वाटायचं हे असं आपल्यालाही जमायला हवं. म्हणूनच मी प्रेक्षक, अभिनेता आणि आता दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांच्याकडून खूप काही शिकत आलोय आणि अजूनही शिकतोय. माझ्या करिअरच्या सुरुवातीला १९९५ मधे ‘सूना येती घरा’ या चित्रपटांत पहिल्यांदा अशोक सरांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी केवळ त्यांचा अभिनयच नाही, तर त्यांची सहजता, सेटवरील त्यांची ऊर्जा आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यानंतर ‘साडे माडे तीन’च्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम करता आलं आणि आता २०२५ मधे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटासाठी आम्ही परत एकदा एकत्र काम केलंय. राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा मोठा सन्मान आहे. पण त्यासाठी कमाल मेहनत आणि कायम दिलखुलास राहण्याची वृत्ती या गोष्टी सोप्या नसतात. पण अशोक सराफ हे नाव याला अपवाद आहे. अशोक सराफ सर, तुमच्या कला प्रवासाला सलाम! महाराष्ट्राच्या हृदयात आधीपासूनच तुमचं अढळ स्थान होतं. आज त्यावर ‘पद्मश्री’ची मोहोर उमटली आहे. मनापासून अभिनंदन आणि खुप प्रेम!”
प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, अंकुश चौधरीच्या वर्कफ्रंटबद्द बोलायचं तर, अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांसाठी चाहते कमलीचे आतुर आहेत. नुकतंच अभिनेत्याचा वाढदिवस झाला, त्याने त्याच्या वाढदिवशी तीन मोठ्या चित्रपटांची घोषणा केली. ‘महादेव’, ‘पी.एस.आय. अर्जुन’ आणि ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ अशा तीन चित्रपटांची घोषणा केली आहे. तसंच, त्याचं दिग्दर्शन असलेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.