(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेते राजेश शर्मा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभासच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका किड्याने चावा घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर पश्चिम बंगालमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असून चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भावनिक पोस्ट शेअर करत राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. अक्षयने लिहिले, “माझा प्रिय मित्र राजेशच्या तब्येतीबद्दल समजल्यानंतर मला खूप काळजी वाटली. चित्रीकरणादरम्यान त्याला एका किड्याने चावा घेतल्याचे समजले. देव त्याचे रक्षण करो. लवकर बरा हो मित्रा, आपण अजून खूप हसायचं आहे.” या पोस्टसोबत अक्षयने राजेशसोबतचा एक जुना फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे आनंदाने हसताना दिसत आहेत.
राजेश शर्मा आणि अक्षय कुमार यांनी ‘भूत बंगला’, ‘स्पेशल 26’, ‘लक्ष्मी’, ‘मिशन राणीगंज’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. अक्षयच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनीही राजेश यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
Very concerned to hear about my dear friend Rajesh’s health condition after an insect bite while shooting. Hope Mahadev blesses him with fast and complete recovery. Jaldi theek ho ja yaar, abhi saath baith ke bhot hansna hai. pic.twitter.com/n8yH6IYxKH — Akshay Kumar (@akshaykumar) July 9, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये ‘स्पिरिट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेश शर्मा यांच्या पायाला एका किड्याने चावा घेतला. सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, काही तासांनंतर त्यांच्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि संसर्ग झपाट्याने वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांचे बारकाईने उपचार सुरू आहेत.
राजेश शर्मा यांनी ‘खोसला का घोसला’, ‘इश्किया’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे.






