(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Niti Taylor Abusive Relationship: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नीती टेलर हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव प्रथमच उघड केला आहे. ‘कैसी ये यारियाँ’ फेम अभिनेत्रीने एका विषारी आणि हिंसक नात्यातून बाहेर पडताना सहन केलेल्या शारीरिक व मानसिक छळाबद्दल भाष्य केले. तिच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या धैर्याचे कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे.
‘सिगारेटने चटके दिले, थप्पड मारली’
नीती टेलरने The Traitors: Alliance या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या भूतकाळातील एका नात्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, तिचा एक्स बॉयफ्रेंड अत्यंत हिंसक स्वभावाचा होता.
तिने सांगितले, “त्याने मला सिगारेटने चटके दिले होते. एका रात्री त्याच्या वाढदिवसानिमित्त तो स्वतःवरील ताबा गमावला आणि त्याने मला जोरात कानाखाली मारली. त्या क्षणी मी ठरवलं की, हे नातं कायमचं संपवायचं.”
‘आत्मसन्मानासाठी नातं संपवलं’
नीतीने सांगितले की, जेव्हा नातं शारीरिक अत्याचारापर्यंत पोहोचलं, तेव्हा तिने स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ते नातं कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. त्या कठीण प्रसंगानंतर तिने आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला.
‘मी खूप लहान आणि मॅच्युर नव्हते
भूतकाळातील त्या दिवसांची आठवण सांगताना अभिनेत्री म्हणाली, “तेव्हा मी खूप लहान होते आणि तेवढी मला मॅच्युरिटी नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्या व्यक्तीचं खरं रूप मला समजलं नाही. पण जेव्हा माझ्या सहनशीलतेची मर्यादा संपली, तेव्हा मी मागे वळून पाहिलं नाही.”
वैवाहिक आयुष्यावरील अफवांवरही भाष्य
याच शोमध्ये नीती टेलरने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवरही प्रतिक्रिया दिली. तिचा ऑगस्ट 2020 मध्ये परीक्षित बावा यांच्यासोबत विवाह झाला होता. 2024 मध्ये दोघांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
या अफवांवर मौन का बाळगले, याबाबत ती म्हणाली, “प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. जर माझ्या वैयक्तिक आयुष्यात लोक म्हणतात तसं काही घडलंच नसेल, तर मी स्पष्टीकरण का द्यावं?”
2009 मध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नीती टेलरने अनेक लोकप्रिय मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या खुलाशानंतर घरगुती हिंसा आणि विषारी नातेसंबंधांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.






