Television Actor Kushal Badrike Shared Post For His Wife On Social Media
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि अफलातून कॉमेडीच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके चर्चेत राहिलेला आहे. कुशल बद्रिकेने आपल्या निखळ कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवत आणि त्यांचं मनोरंजन करत आपल्या अभिनय कौशल्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कुशल कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेता चाहत्यांसोबत त्याच्या आयुष्यातील अनेक गंमतीजमती शेअर करत असतो. चाहते त्याच्या पोस्टचं कौतुक देखील करतात. अभिनेत्याने त्याच्या पत्नीबद्दल खास पोस्ट शेअर केलेली आहे. कुशल पत्नी सुनयनासोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच त्याने सुनयनाचे काही फोटोज् शेअर करत त्याखाली मजेशीर कॅप्शन देत स्पेशल पोस्ट शेअर केलीये. त्याच्या पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले असून चाहते त्याच्या पोस्टचे कौतुक करीत आहेत.
परदेशामध्ये असलेल्या पत्नीसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना कुशल बद्रिकेने लिहिले की, “अचानक एक दिवस फोन करून माझी बायको मला म्हणते, ह्या देशात लोक खूप भावूक आहेत. आम्हाला इथे प्रभू श्रीराम आणि “माता सीता” म्हणून लोकांनी आमची पूजा केली. जवळजवळ गेला महिनाभर, माझी बायको तिच्या कथ्थकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशात (Trinidad and Tobago मध्ये) आहे. त्यात ती “सीता मातेची” भूमिका करते. मी तिला म्हणालो की, अगं, ती सीता “प्रभू रामां”सोबत किती तरी वर्ष जंगलात चालत राहिली. आपण डोंबिवलीला असताना, मी “तुला” २– ३ वेळा डोंबिवली स्टेशन ते घर चालत नेलं होतं, तर आजसुद्धा भांडणात तो मुद्दा घेऊन येतेस आणि “माता सीता” म्हणून तुम्हाला पूजल्याचं कौतुक मला सांगतेस…! त्या नंतर फोनवरच आमच्यात थोडंसं रामायण घडलं. अर्थात, माझा पराभव झाला. माता सीतेपुढे दशानन रावण हरला, तिथे आपली काय बिशाद! असो, पण आता ये घरी परत… खऱ्या आयुष्यात आपण “राम-सीता” नसलो तरी “तू” सोबत नसताना आयुष्य म्हणजे वनवासच गं !!– सुकून”