Rajkummar Rao Reaction On Marathi Hindi Row Says Not Necessary To Speak On Every Topic
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातलं वातावरण मराठी- हिंदी भाषेवरून ढवळून निघालं आहे. राजकीय नेतेमंडळी, सामान्य नागरिक आणि मराठी सेलिब्रिटी यांनी हिंदी सक्तीवरून आपली प्रतिक्रिया दिली. नुकतंच ठाकरे बंधूंनी एकत्र येत, विजयी मेळावा सुद्धा साजरा केला. आता अशातच मराठी सेलिब्रिटींनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीही मराठी- हिंदी भाषा वादावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने भाष्य केलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना राजकुमार रावने स्पष्ट शब्दात स्वत: चं मत मांडलं आहे.
चित्रपट, नाटक आणि आता वेब विश्वात पदार्पण, “मिस्त्री” मध्ये साकारणार अनोखी भूमिका
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता ‘मलिक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. येत्या ११ जुलै रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अलीकडेच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, राजकुमार रावने IANS वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, “कलाकाराला जर एखाद्या मुद्द्यावर व्यक्त व्हावसं वाटत असेल, तर त्याने नक्कीच व्यक्त व्हावं. प्रत्येक कलाकाराने प्रत्येक मुद्द्यावर बोलणे आवश्यक नाही. शिवाय सोशल मीडियावर सुद्धा काहीतरी पोस्ट न करणे म्हणजे त्यांना त्या मुद्द्याची पर्वा नाही असे होत नाही. कलाकार संवेदनशील असतात आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रभावित होतात. परंतु सोशल मीडियावर सर्वकाही पोस्ट करणे आवश्यक नाही.”
राजकुमार रावने मुलाखती दरम्यान काही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रश्न उपस्थित करताना अभिनेता म्हणाला की, “सोशल मीडियावर नसलेल्या लोकांना दुःख होत नाही का? चांगल्या गोष्टींबद्दल त्यांना आनंद होत नाही का? सोशल मीडिया हे त्यांचे आनंद आणि दुःख व्यक्त करण्याचे एकमेव माध्यम आहे का? मुळात हा समज चुकीचा आहे.” असा सवालही त्याने उपस्थित केला. मुलाखती दरम्यान, अभिनेत्याने एका विमान अपघाताचा भावुक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “मी एका विमान अपघाताचा फोटो पाहून खूप रडलो होतो. पण, ते देखील सोशल मीडियावर टाकून व्यक्त होणं आवश्यक आहे का ही प्रत्येकाची वैयक्तिक भावना आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकल्याने त्याच्याप्रती संवेदनशीलता कमी होते या मताचा मी आहे. “असा खुलासा अभिनेत्याने केला.