(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित लोकप्रिय हिंदी ड्रामा मालिका ‘एस्पिरेंट्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या बहुचर्चित मालिकेच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्राइम व्हिडिओने रिलीज केला असून, यामध्ये कथेला एका नव्या टप्प्यावर नेण्यात आले आहे. मुखर्जी नगरमध्ये UPSC च्या तयारीपासून सुरू झालेली ही कथा आता सत्तेच्या उंच पदांवर पोहोचलेल्या पात्रांच्या आयुष्यातील गुंतागुंती दाखवते. जुन्या महत्त्वाकांक्षा, मैत्री आणि आदर्श तत्त्वांची परीक्षा घेताना सध्याच्या जबाबदाऱ्यांशी होणारा संघर्ष या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.
या सीझनचे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. मालिकेत नवीन कस्तुरिया, शिवांकित सिंह परिहार, अभिलाष थपलियाल, सनी हिंदुजा, नमिता दुबे आणि तेंगम सेलीन हे त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये पुन्हा दिसणार आहेत. याशिवाय, जतिन गोस्वामी यांची नव्या सदस्याच्या रूपात टीममध्ये एन्ट्री झाली आहे. ‘एस्पिरेंट्स’ सीझन 3 चा प्रीमियर 13 मार्च रोजी भारतासह जगभरातील 240 पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
नव्या सीझनबद्दल बोलताना नवीन कस्तुरिया म्हणाले, “‘एस्पिरेंट्स’ माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहिली आहे, कारण प्रेक्षकांनी फक्त अभिलाषला पडद्यावर पाहिलं नाही, तर त्याच्या प्रवासासोबत स्वतःलाही वाढताना अनुभवले आहे.”
तसेच पुढे सांगितले, “तिसऱ्या सीझनमध्ये आपण त्याला अशा वळणावर पाहतो, जिथे कागदोपत्री त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं, पण प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव खूप गुंतागुंतीचं असतं. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या मनातील खंत आणि ज्यांनी त्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्या लोकांना गमावण्याची भीती यामध्ये तो अडकलेला असतो. माझ्यासाठी हा भाग खूप दमदार होता, कारण यात दाखवले आहे की जेव्हा सर्व काही दावावर लागलेलं असतं तेव्हा यश कसं वाटतं. या वेळी अभिलाषचं पात्र आपल्या भावना आणि कमतरतांबाबत अधिक प्रामाणिकपणे समोर येईल. लोकांना त्याच्या कथेशी जोडलेलं पाहून मला आनंद होतो आणि त्याचा पुढचा प्रवास कुठे नेतो हे दाखवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
या नव्या सीझनमध्ये अभिलाषच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा दाखवण्यात आला आहे. कागदोपत्री त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असलं, तरी प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव अधिक गुंतागुंतीचं असल्याचं दिसून येतं. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या मनातील संघर्ष आणि नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या दुराव्यामुळे त्याचा प्रवास अधिक आव्हानात्मक बनतो. दुसरीकडे, संदीप भैय्या देखील बदलत्या परिस्थितीत स्वतःच्या आदर्शांशी आणि निर्णयांशी झुंज देताना दिसतात. मैत्री, स्वप्नं आणि यशानंतर येणाऱ्या अडचणी यांचा वास्तववादी संघर्ष या सीझनमध्ये अधिक प्रभावीपणे उलगडताना दिसणार आहे.






