Ankush Chaudhary Upcoming Movie PSI Arjun Release Date Announced
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या हँडसम हंक अभिनेत्याचा वाढदिवस ३१ जानेवारीला पार पडला. अभिनेत्याच्या वाढदिवशीच त्याच्या अनेक चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकीच एका चित्रपटाचा आता मोशन पोस्टर रिलीज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘पी.एस.आय.अर्जुन’ (P.S.I Arjun) असं असून हा चित्रपट येत्या ९ मे २०२५ ला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.
अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत असलेला ‘पी.एस.आय.अर्जुन’ नावाचा चित्रपट येत्या ९ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुश चौधरीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटाचा पहिला वहिला मोशन पोस्टर शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतला पी एस आय चा लूक पाहायला मिळत आहे, जो चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करणारा आहे.
सोशल मीडियावर मोशन पोस्टर चांगलंच गाजत असून अनेकजण अंकुशचा आगामी चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे. सिनेमाचं मोशन पोस्टर अतिशय भन्नाट असून अनेकजण याचं कौतुक करत आहेत. “थांब म्हटलं की थांबायचं यंदाच्या मे महिन्यात तापमान अधिकच गरम होणार आहे.” अशी चित्रपटाची टॅगलाईन देत इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर करण्यात आला आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित विक्रम शंकर प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.
मोकळे केस, माथ्यावर टिकली अन्…; महिला दिनी सोनाक्षी सिन्हाचा ‘जटाधारा’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज
दरम्यान, ‘दगडी चाळ २’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटानंतर अंकुशचा फार मोठ्या ब्रेकनंतर आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याच्या या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्याच्याबरोबर कोणकोणते कलाकार काम करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते वाट बघत आहेत.