प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली पंतप्रधानांची भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. यासाठी अवघ्या राज्यात रोज वेगवेगळ्या ठिकाणी राज्यासह देशातल्या दिग्गज व्यक्तिमत्वांच्या सभा होत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात बऱ्याच सभा झाल्या. निवडणूकीनिमित्त पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांची भेट एका मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली. त्याने खास इन्स्टा पोस्ट शेअर करत पंतप्रधानांच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणारा मराठमोळा अभिनेता सुशांत शेलार आहे. सुशांत शेलारने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. “एक अविस्मरणीय क्षण” असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे ही भेट झाल्याचंही सुशांतने म्हटलं आहे. “भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट. एक अविस्मरणीय क्षण! हे सर्व आपले मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे शक्य झाले आहे. मा.शिंदे साहेबांनी सामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचे काम नेहमीच केले आहे. आणि यामुळेच आम्हाला सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळते!”, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे.
पंतप्रधान मोदी यांची काल मुंबईत आणि नवी मुंबईत सभा झाली. या सभे दरम्यानच्या भेटीगाठीचे हे फोटो आहेत. दरम्यान, मराठमोळा अभिनेता सुशांत शेलार हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटातील कार्यकर्ता आहे. शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेना अध्यक्ष ही दोन पदाचा कार्यभार सध्या तो सांभाळत आहे. महायुतीकडून वरळी मतदारसंघाची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती. महायुतीच्या प्रचार रॅलीतही तो अनेकदा दिसतो. शिवाय अभिनेता वेगवेगळ्या कामांतून तो चर्चेत राहण्याचाही प्रयत्न करतो.
हे देखील वाचा- अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या ‘जर्नी’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित