(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी शाळांची घटती संख्या, खालावलेली पटसंख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाची कमी होत जाणारी आवड… या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाचा प्रचंड मनोरंजक असा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत ढोमे यांचे विषय हे नेहमीच तुमच्या आमच्या घरातले असतात आणि म्हणूनच ते प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटतात. त्यामुळे आता या चित्रपटात पुन्हा एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात झालेली शाळा आणि मग त्या काळातल्या सगळ्या आठवणी पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षागृहात आपलं मनोरंजन करणार हे नक्की झाले आहे.
स्वतःच्या वाढदिवशी अॅक्शन मोडमध्ये दिसला नागा चैतन्य, महेश बाबूने NC24 चे शीर्षक केले जाहीर
चित्रपटाच्या टीझरबद्दल बोलायचे झाले तर, मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात सापडली असताना, जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेला भेट देतात असं या टीझरमध्ये दिसत आहे. भेटीनंतर सुरू होते ती, त्यांच्या शाळेतील आठवणींची, नात्यांची आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाची नवी गोष्ट. दिग्दर्शक हेमंत ढोमे यावेळेस प्रेक्षकांना आपल्या शालेय जीवनाची सफर घडवणार आहे. यात मराठी कलाकारांची दमदार केमिस्ट्री झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे या चित्रपटाबद्दल म्हणाले , “शाळा हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. आपण घडतो ते शाळेतच. पहिली भिती, पहिला राग, पहिली मेत्री, पहिलं प्रेम हे सारंकाही आपण शाळेतच अनुभवतो. त्यामुळेच मराठी शाळेचं हे भावविश्व रंगवताना प्रेक्षकांना त्यांच्या शाळेतल्या आठवणी अनुभवायला मिळतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करत मराठी शाळांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे मला खात्री आहे प्रेक्षकांना आपली शाळा आठवणार आणि मराठी शाळा पुन्हा भरणार आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
येत्या नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत. या सर्वांनी मिळूनच झिम्मा आणि झिम्मा २ या चित्रपटांची निर्मिती केली होती. जसा या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांना प्रतिसाद मिळाला तसा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाला देखील मिळेल असे आशा आहे.






