(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
झी मराठी वाहिनीने नेहमीच दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणले आहेत. याच परंपरेला पुढे नेत, वाहिनीने आता एक भव्य महासंगम आयोजित केला आहे. ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या खूप आवडत्या ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन सुपरहिट मालिकांचे पात्र एकत्र दिसणार आहेत.या विशेष भागांचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये या महासंगमाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या ‘मकरसंक्रांत विशेष महासंगम भागात ७ दिवस ७ खुलासे’ होणार आहेत. अनेक धक्कादायक वळण प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यामध्ये कमळी आपल्या जिद्दीच्या जोरावर श्रीकांतची सुटका करणार असून, तिच्यामुळे श्रीकांत आणि भावना यांची भेट घडून येणार आहे. तसेच, अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला असून अन्नपूर्णासमोर अखेर त्यांची खरी नात येणार आहे. कथानकातील संघर्षाबद्दल बोलायचे झाले तर, अन्नपूर्णा आणि लक्ष्मी एकत्र येऊन दुष्ट कामिनीला तिच्या कृत्याबद्दल जन्माची अद्दल घडवताना दिसतील. काही काळापासून चाललेला हा शोध आता संपणार असून, जयंतसमोर जान्हवी येणार आहे. तसेच, कामिनीसमोर कमळीची आई सरोज प्रत्यक्ष उभी राहणार आहे. मात्र, याच दरम्यान कमळीला जान्हवीचे कटू सत्य कळणार असून सरोज पुन्हा एकदा कामिनीच्या तावडीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राच्या या दोन सुपरहिट मालिकांचा हा रोमहर्षक महासंगम दीड तास म्हणजेच रात्री ८:०० ते ९:३० या वेळेत झी मराठीवर पाहता येणार आहे. कौटुंबिक भावना, सामाजिक लढा आणि रहस्यांचा उलगडा असा हा मनोरंजनाचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांसाठी मकरसंक्रांतीची मोठी भेट ठरणार आहे.






