(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला असून त्यात दिसणारा त्यांचा रांगडा लहेजा, ठसकेबाज संवादफेक आणि अस्सल गावाकडचा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात त्या गावातील एका खंबीर आणि जिद्दी स्त्रीची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
‘सुपर डुपर’मध्ये निर्मिती सावंत यांची व्यक्तिरेखा ही केवळ घर सांभाळणारी नसून परिस्थितीशी दोन हात करणारी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री आहे. ट्रेलरमधूनच त्यांच्या भूमिकेची ताकद आणि वास्तवता स्पष्ट होते. ही भूमिका अधिक प्रभावी आणि खरी वाटावी यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
ग्रामीण भागातील भाषेचा नेमका फ्लेवर, रांगडेपणा आणि बोलीभाषेतील सूक्ष्म बारकावे अचूक साधण्यासाठी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे यांची मदत घेतली. त्यांनी स्क्रिप्ट त्यांच्यासोबत शेअर करून, संवादातील शब्दप्रयोग, वाक्प्रचार आणि स्थानिक लहेजा समजून घेतला. मकरंद अनासपुरे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या भूमिकेला अधिक नैसर्गिक आणि वास्तववादी स्वरूप प्राप्त झाले आहे.
याबाबत बोलताना निर्मिती सावंत म्हणाल्या, “मी साकारत असलेली भूमिका ही एका गावाकडच्या बाईची आहे, जिचं आयुष्य आणि जगणं अत्यंत वास्तव आहे. या भूमिकेत भाषेचा आणि लहेजाचा अचूकपणा खूप महत्त्वाचा होता. त्यामुळेच मी मकरंद अनासपुरेशी संपर्क साधला. ते त्या भागातील असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला त्या बोलीचा नैसर्गिकपणा समजला. काही विशिष्ट शब्द कसे वापरले जातात, हे कळल्यामुळे ही भूमिका अधिक खरी वाटू लागली. अन्यथा ही भूमिका माझ्या इतर भूमिकांप्रमाणेच राहिली असती, पण आता ती प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा मला विश्वास आहे.”
चित्रपटांची निवड करतानाही निर्मिती सावंत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतात. स्क्रिप्ट वाचताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतरच त्या भूमिका स्वीकारतात. चित्रपटाचे प्रॉडक्शन हाऊस, दिग्दर्शक, लेखक, छायाचित्रकार (DOP) यांसारख्या प्रत्येक घटकाचा त्या बारकाईने विचार करतात. नव्या कलाकारांमध्येही जर त्यांना ‘स्पार्क’ दिसला, तर त्यांच्यासोबत काम करण्यास त्या सदैव उत्सुक असतात.
नवीन वर्षात विविध चित्रपटांमधून वेगवेगळ्या आणि लक्षवेधी भूमिका साकारत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप अधिक गडद केली आहे. ‘सुपर डुपर’मधील त्यांची ही ग्रामीण भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल, यात शंका नाही. झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून, चित्रपटाचे छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.






