(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
मराठी टेलिव्हिजन विश्वात कथाकथनाचा नवा प्रयोग म्हणून प्रेक्षकांची मने जिंकणारी कलर्स मराठीवरील ‘बाईपण जिंदाबाद’ ही मालिका स्त्रीच्या आयुष्याकडे पाहण्याचा वास्तववादी दृष्टिकोन सातत्याने मांडत आहे. समाजातील स्त्रीत्वाच्या बदलणाऱ्या संकल्पना या मालिकेने अगदी चपखल सादर केल्या असून प्रत्येक वेळी नात्यांच्या, भावनांच्या आणि तिच्या मनातल्या द्वंद्वाच्या कथा सांगितल्या आहेत. या मालिकेत येणारी नवी कथा ‘शर्ट’ ही त्याच प्रवासातील एक संवेदनशील आणि मनाला भिडणारी कथा आहे. या कथेचं शीर्षक आणि त्यातून उलगडणारी कथा दोन स्त्रियांच्या जीवनातील अनोख्या नात्यांचा अकल्पित प्रवास मांडते. एका अनपेक्षित भेटीतून सुरू होणारा हा प्रवास दुःख, अपराधीपणा आणि क्षमेच्या भावनेतून एका नव्या नात्याची बीजे रुजवतो. आजच्या स्त्रीची ही गोष्ट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल. कधी डोळ्याच्या कडेला ओलावेल, तर कधी चेहऱ्यावर हास्य फुलवेल.
Marathi Serial TRP: टीआरपी स्पर्धेत ‘या’ मालिकेने मारली बाजी; जाणून घ्या टॉप 5 मालिकांची यादी
कथेत वसुधाची व्यक्तिरेखा दीपा परब हिने साकारली असून मानसीच्या भूमिकेत आहे क्रांती रेडकर आहे. मराठीतील या दोन अभिनयसंपन्न सशक्त अभिनेत्री कथानकाच्या केंद्रस्थानी असून त्यांनी या कथेतील वसुधा आणि मानसी या व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केल्या आहेत. वसुधाच्या आयुष्यात अचानक आलेल्या मानसीला एक शर्ट हवा आहे यापासून सुरू होणारी त्यांची गोष्ट नात्याच्या एका अकल्पित प्रवासाला जन्म देते. हा उलगडणारा संवेदनशील प्रवास फक्त नात्यांचा नाही; तो आहे स्वीकाराचा, क्षमेचा आणि आत्मभानातून उमलणाऱ्या बाईपणाचा.
‘बाईपण जिंदाबाद’च्या प्रत्येक कथेतून स्त्रीचं अंतर्मन, तिचं धैर्य, आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दिसतो. समाजाच्या चौकटीत न अडकता ती स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्क मिळवते. तिचं बाईपण म्हणजे फक्त नात्यांचं ओझं नव्हे, तर प्रेम, जीवनसृजन आणि आत्मभानाचं प्रतीक आहे. ही मालिका स्त्रीच्या अश्रूंमागचं सामर्थ्य, शांततेतील आवाज आणि हसण्यातली जिद्द दाखवणारी हृदयस्पर्शी सफर आहे.






