Santosh Juvekar Appeals Help Orphan Tribal Children Education Calls It True Service To Vitthal On Ashadhi Ekadashi 2025
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटामुळे अभिनेता संतोष जुवेकरला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्याने चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा संतोष सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने आषाढी एकादशीनिमित्त एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त संतोषने समाज उपयोगी कार्य केले आहे. आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी ‘सेवाच खरा धर्म’ हा संदेश देत समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी मदतीचे आवाहन केलं आहे. संतोष जुवेकरनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या मित्र ईश्वर काळेच्या कार्याची माहिती दिली आहे.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली
पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, “मित्रांनो आमचा एक मित्र आहे. ईश्वर काळे जो बरडगाव, D T जिल्हा कर्जत, अहमदनगर येथे काही आदिवासी गरीब मुलांसाठी आणि काही अनाथ मुलांसाठी शाळा चालवतो आणि त्या मुलांना राहण्यासाठी त्यांच्या निवाऱ्याची सोय सुद्धा तोच करतो. अगदी स्वतःच्या पोटच्या पोरांसारखं त्यांना सांभाळतो आणि त्याच्या या महान कर्तव्यात आम्ही त्याचे काही मित्र त्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या माझ्या या मित्राला त्याच्या पोरांच्या पोटाच्या भुकेच्या काळजीन थोडं टेन्शन आलेय. शिवाय पावसाचे दिवस आहेत, राशनची कमतरता आहे. मी आणि माझे मित्र आम्ही आमच्या परीने जसं आणि जेवढ जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोच आहोत. त्यात तुम्ही सुद्धा तुमच्या परीने हातभार लावलात तर आपला मित्र आणि त्याची पोरं निर्धास्त होतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. मला वाटतं ह्या आषाढीएकादशी निमित्ताने हीच माऊलींची सेवा केल्यासारखं आहे. राम कृष्ण हरी…”, असं म्हणत संतोष जुवेकरने मदतीचं आवाहन केलंय. अभिनेत्याने संबंधित शाळेचे नाव आणि इतर माहिती पोस्टमध्ये नमुद केली आहे.