फोटो सौजन्य - Social Media
शिवानी म्हणाली, “२०२५ माझ्यासाठी अत्यंत खास आहे. याच वर्षी, जानेवारी महिन्यात माझं लग्न झालं आणि माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली. लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. माझ्या बाबतीत हे सगळे बदल सकारात्मक ठरले.”
तिने पुढे सांगितले की, कुटुंबापासून दूर राहण्याची सवय नसल्याने सुरुवातीला थोडी भावनिक ओढ जाणवते. “मी कुटुंबाला खूप मिस करते. याच वर्षी माझा धाकटा भाऊही कामासाठी बंगळुरूला गेला. पहिल्यांदाच तो माझ्यापासून दूर आहे. मात्र तो त्याचं करिअर घडवत आहे, आयुष्यात पुढे जात आहे, हे पाहून मनाला समाधानही वाटतं,” असे शिवानीने भावुकपणे सांगितले.
व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना शिवानीने २०२५ हे वर्ष तिच्या करिअरसाठीही महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. “याच वर्षी मला ‘तारिणी’ ही नवी मालिका मिळाली. मी साकारत असलेलं पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. झी मराठी आणि निर्मिती संस्थेसोबतचं हे माझं पहिलंच असोसिएशन आहे. संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूपच सकारात्मक आणि समाधानकारक आहे,” असे ती म्हणाली.
२०२५ मधील अविस्मरणीय क्षणांविषयी सांगताना शिवानी म्हणाली, “माझं लग्न आणि ‘तारिणी’ मालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लागलेली भलीमोठी होर्डिंग्स हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. स्वतःला इतक्या मोठ्या स्वरूपात पाहणं हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. ते पाहून मी प्रचंड आनंदी झाले होते.” मात्र या यशस्वी वर्षाबरोबरच एक खंतही असल्याचे शिवानीने प्रामाणिकपणे कबूल केले. “या वर्षी आरोग्याकडे पाहिजे तेवढं लक्ष देता आलं नाही. त्यामुळे २०२६ मध्ये व्यायाम, पुरेशी झोप आणि एकूणच दिनचर्या सुधारण्याचा ठाम संकल्प केला आहे. हे सध्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ आहे, पण मी नक्कीच याकडे गंभीरपणे पाहणार आहे,” असे ती म्हणाली.
नववर्ष साजरे करण्याबाबत बोलताना शिवानी म्हणाली, “दरवर्षी मी कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत नववर्ष साजरे करते. मात्र यंदा कदाचित ‘तारिणी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असेन. तरीही शूट सांभाळून माझ्या प्रियजनांसोबतच नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे.” शेवटी ती म्हणाली, “२०२५ तू माझं आयुष्य सकारात्मक केलंस. आता २०२६ कडूनही नवीन आशा, आरोग्य आणि आनंदाची अपेक्षा आहे.”






