"हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली प्रॅापर्टी पेटवून द्या...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी कलाकारांची पोस्ट चर्चेत
पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. १६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. यासोबतच हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक हिंसाचार असल्याचा आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्यभरातील राजकीय मंडळींसह कलाकारांनीही या घटनेबद्दल राग व्यक्त केला आहे. अभिनेत्री आश्विनी महांगडे, अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे, सोशल मीडिया एन्फ्लूएंसर संकेत कोरलेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी भाष्य केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रवीण तरडे म्हणतात, “हुंड्याच्या पैशांमधून उभारलेले घरदार प्रॅापर्टी पेटवून द्या… कुणा बहिणीचा असा छळ चालू असेल तर पुढे येऊन बोला.. समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत…”
आता या घटनेबद्दल अभिनेत्री अश्विनी महांगडेने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हणाली की, “ही माणसं शिकलेली, पैशाने श्रीमंत असली तरीही मानसिकता… सुनेला मारहाण करून, दरवेळी माहेरकडून काहीना काही आणायला सांगणे ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी. आता जर हे प्रकरण दाबले, तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे.” यासह तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उल्लेख करत “आपलीच लाडकी बहीण” असं म्हटलं आहे. शिवाय या घटनेचा जाहीर निषेधही अश्विनीने व्यक्त केला आहे.
शिल्पा शिरोडकर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत म्हणाली…
सोशल मीडिया इन्फ्लूएंसर संकेत कोरलेकरनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने फेसबूक पोस्ट शेअर करत लिहिले की, “माननीय सरकार, हुंड्यामुळे आजही जीव जात आहेत. कुणी मंत्री असो वा श्रीमंतीने माजलेलं घराणं… कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे दाखवून देण्याची आणि ह्या आधी तुमच्याकडून न्याय न मिळालेल्यांना किमान समाधान मिळवून देण्याची ही योग्य वेळ आहे. आजही हुंड्यामुळे अनेक बळी जात असतील पण आपल्यापर्यंत तोच बळी पोहोचतो जो प्रसिद्धीच्या झोतात असेल. हुंड्यामुळे एका तान्ह्या बाळाची आई हे जग सोडून जाते आणि तिचा जीव घेणाऱ्यांवार ठोस गुन्हा होत नाहीये ही खूप वाईट गोष्ट आहे. हुंडा घेणे आणि त्यासाठी छळ करणे ही मानसिकता मुळातून नष्ट होईल अशी शिक्षा व्हावी हीच मी सरकार कडून अपेक्षा करतो. त्या लहानश्या मुलाचे भविष्य त्याच्या दिवंगत आईच्या पश्चात उज्वल व्हावे हीच प्रार्थना. एक कलाकार म्हणून मी ह्या कृत्याचा निषेध करतो.”