'महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते'; 'या' नेत्याने केला मोठा दावा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असतानाच, अजित पवारांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासमोर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात या गटाची दिशा, निर्णयप्रक्रिया आणि राजकीय रणनीती काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले होते. निवडणूक आयोगाने दिवंगत अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह देऊ केले होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आमची वाटचाल असेल, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती येथे केले.
शशिकांत शिंदे म्हणाले, आता सत्य बोलणे गरजेचे आहे. महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ, असे अजित पवार यांनी स्वतः सांगितले होते. त्या अनुषंगाने काही बैठका देखील झाल्या होत्या. अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच हे वक्तव्य करत होते. त्यामुळे त्याच दिशेने आमची पुढील वाटचाल असेल.
अजित पवारांकडून यापूर्वी अनेकदा संकेत
अजित पवार यांनीही यापूर्वी एका जाहीर सभेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अप्रत्यक्ष संकेत दिले होते. आम्ही एकत्र आलो की काही लोकांच्या पोटात दुखायला का लागते? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला होता.
एकत्र येण्याचे ‘गिफ्ट’ द्यायचे होते
पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणावर मोठे भाष्य केले आहे. १२ डिसेंबरला दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचे गिफ्ट साहेबांना देण्याचे अजित पवारांच्या मनात होते, असे अंकुश काकडे यांनी सांगितले. राजकारणातील माझी आणि अजितदादांची सुरुवात एकाच वेळेला झाली. दादा हे आमचे नेते नेहमी राहिले, पवार साहेबांचा राजकीय वारसा घेऊन दादांनी केलेले काम महाराष्ट्र विसरू शकणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढील दिशेकडे राज्याचे लक्ष
अजित पवारांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा सलोखा निर्माण होणार का? याबाबत उत्सुकता वाढली असून, शशिकांत शिंदे यांच्या या विधानामुळे एकत्र येण्याच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाल्याचे मानले जात आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : Sunetra Pawar: अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे? नरहरी झिरवाळ यांनी थेट मांडला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव






