'महाराष्ट्रातील जनता निराश, राज्य सध्या चुकीच्या दिशेला चाललंय'; सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका (फोटो- सोशल मिडिया)
कोल्हापूर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांची निवडणूक असताना मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी यावं लागतं. मग स्थानिक नेत्यांची तेवढी ताकद नाही का? असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांकडून जनतेवर आश्वासनाची खैरात केली जात असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तर हेलिकॉप्टरमधून सातबारा उतारे फेकायचे बाकी राहिले आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर केली.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, “महायुती सरकारची आर्थिक परिस्थिती बघता अधिवेशन घेण्याची आर्थिक ताकद देखील या सरकारकडे नाही. आधी रस्त्यावरचे खड्डे भरा, मग प्रॉपर्टी कार्ड आणि दुबई सारखं स्वप्न दाखवा. स्थानिक नेतृत्वात ताकद नाही. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रचारसभा घेत आहेत. अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती आहे. लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. लोकांनी याबाबत महायुतीला जाब विचारला पाहिजे”.
हेदेखील वाचा : “मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा
तसेच काँग्रेस नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत जोरदारपणे निवडणुका लढवत आहोत. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, निकाल काहीही लागला तरी चिन्ह लोकांपर्यंत पोहचं पाहिजे. काँग्रेसचं चिन्ह नाही, असं म्हणणं म्हणजे विरोधकांचा अभ्यास कमी असल्याचं द्योतक आहे, असं सतेज पाटील म्हणाले.
जास्तीत जास्त चिन्हावर आम्ही उभे
ते पुढे म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभा आहोत. महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे, हे समोर आले आहे. कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. मालक आम्ही आहे, पण हे सरकार विसरलं की तिजोरीचे मालक महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळं सावळा गोंधळ सुरू आहे, हे बाहेर आलं आहे. महाराष्ट्रातील जनता निराश आहे, राज्य चुकीच्या दिशेला चालले आहे. महायुतीत अस्वस्थता आहे, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. तुमच्या लोकांवर तुमचे कंट्रोल नाही हे समोर आलं आहे’.
…तर निवडणूक आयोगाने कारवाई करावी
एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे, असं म्हणत असेल तर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे. मतदार यादीतील घोळ किती मोठ्या प्रमाणात आहे. हे वारंवार समोर येत असून, ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगात सांगतो. त्या ठिकाणी आम्ही मतदारयादी नीट करू शकत नाही. यासारखी शोकांतिका नाही. राजकीय पक्षांनी हे काम करायचं म्हटलं तर निवडणूक आयोग कशाचे पैसे घेते. थोडा वेळ लागला. निवडणुका पुढं गेल्या तरी चालेल, पण हे दुरुस्त करून घ्यावे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : ‘…तर ते माझ्या टार्गेटवर असतील, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल’; सतेज पाटील यांनी दिला इशारा






