भाजप नेते जयकुमार गोरे यांनी महिलेला पाठवला विवस्त्र फोटो संजय राऊत विजय वडेट्टीवारांचा आरोप (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतीच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता विरोधकांनी सत्ताधारी आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहे. महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप करत भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.
महायुतीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धनंजय मुंडेंनंतर विरोधकांनी भाजप नेते व विद्यमान मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थेट नाव घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राऊत म्हणाले की, स्वारगेटप्रमाणे जे प्रकरण समोर येत आहे. तसाच एक प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला पुढल्या काही दिवसांत विधानभवनासमोर उपोषणाला बसतेय. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. हे सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत त्यांची अमित शाहांकडे तक्रार करणार आहे,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री, पैलवान मंत्री जो रोज व्यायाम करतो तो विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो. 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो. त्या पलिकडे जाऊन 10 हजार रुपयांचा न्यायालयामध्ये माफी मागून दंड भरतो. आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या ब्लॅकमेल करत मागे करत लागतो. विवस्त्र फोटो पाठवणारा मंत्री जर मंत्रिमंडळामध्ये असेल तर या पेक्षा लज्जास्पद ते काय आहे? महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या मंत्रिमंडळामध्ये अशा काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी वाढत चालली आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यानंतर भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.