आता प्रश्न ध्वजारोहणाचा ! गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे कारण देत म्हटलं... (File Photo : Chhagan Bhujbal)
मुंबई : सध्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार सत्तेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी वाढला आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदियात ध्वजारोहणास नकार आहे. त्यामुळे आता महायुतीतील नेत्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे नाराज असल्याची अटकळ आधीच लावली जात होती. परंतु, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्री झालेले छगन भुजबळ महायुती सरकारच्या नाराज मंत्र्यांच्या गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहणाच्या आदेशाचे पालन करण्यास असमर्थता दर्शविली आहे.
दरम्यान, १५ ऑगस्टला गोंदिया जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यास भुजबळ यांनी नकार दिल्यामुळे आता कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा गोंदिया जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहे.
गोगावले-तटकरे यांच्यातही संघर्ष
उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री गोगावले आणि भुसे यांनी या निर्णयाला विरोध केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. परंतु, त्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर कोणताही निर्णय झालेला नाही. तर, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात अनेकदा तीव्र शाब्दिक खडाजंगी झाली आहे.
पालकमंत्रिपदावरून सात महिन्यांपासून रस्सीखेच
राज्यातील रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या ७ महिन्यांपासून सत्ताधारी महायुती सरकारमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे तर मंत्री दादा भुसे यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे आहे.
जानेवारी 2024 मध्ये केली गेली घोषणा
जानेवारी २०२४ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री घोषित केले होते.