मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात आज भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची रविवारी भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ यामुळे अधिवेशन गाजले होते. यावरून फडणवीस यांनी सभागृहात सर्वपक्षीय आमदारांना खडसावले होते. जनता आमदारांना शिव्या देत आहे, आमदार माजले आहेत, असे तिखट भाष्य त्यांनी केले होते. या प्रकारानंतर सत्ताधारी-विरोधकांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
हेदेखील वाचा : FIR Filed Against Rohit Pawar: विधानसभेतील ‘ते’ प्रकरण अंगलट…; रोहित पवारांविरोधात FIR दाखल
दरम्यान, नितीन देशमुख यांनी शनिवारी सकाळीच शरद पवार यांची भेट घेतली. देशमुख यांनी विधिमंडळाच्या लॉबीतील मारहाणीची माहिती पवारांना दिल्याची शक्यता आहे. देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने हा प्रकार गाजला होता. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटका झाली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, याची उत्सुकता आहे.
देशमुख-पडळकर कार्यकर्त्यात बाचाबाची
नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीने वादाला सुरुवात झाली. सुरूवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणातच टोकाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे, या दोघांमध्ये यापूर्वीही तणावाचे प्रसंग घडले होते. त्यामुळे ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. यामुळे राजकारणही चांगलेच तापले होते.
हेदेखील वाचा : ‘OBC साठी राहुल गांधी ठरणार दुसरे आंबेडकर’, काँग्रेस नेता उदित राजचे मोठे विधान, भाजपावर साधला निशाणा