
CJP Protestor detained
CJP Protest : राजधानी दिल्लीत SIR प्रक्रियेविरोधातील आंदोलनावरून वातावरण तापलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
CJP च्या आंदोलनाला विद्यार्थी संघटना, जेन-झी आणि विरोधी पक्षांमधील कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
अभिजीत दीपके यांच्यासोबत आयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही IGI विमानतळावर विमान उतरल्यानंतर ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि ध्रुव राठी यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. मुंबईत तुषार गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी 1,700 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं वृत्तही समोर आलं आहे.
आपल्याला पोलिसांकडून ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी रात्रीच व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला होता. त्यांच्या ताब्यानंतर CJP कडून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला.
या व्हिडिओत अभिजित दीपके यांनी आंदोलकांना एकजूट राहण्याचं आवाहन केलं आहे. आपण आणि इतर पदाधिकारी ताब्यात असलो, तरी आंदोलन थांबणार नाही, असं त्यांनी सांगितलं असून जंतर-मंतरवरील आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवलं असल्याचं सांगितलं आहे. तसेच, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, आंदोलनांवर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांवरून बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. सरकारकडून आंदोलनांवर ज्या पद्धतीने निर्बंध घातले जात आहेत, त्याला ‘अघोषित आणीबाणी’ असं संबोधत असोसिएशनने निषेध नोंदवला आहे.
केंद्र सरकार दिल्ली पोलीस यांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईमुळे हा मुद्दा आता अधिकच तापण्याची चिन्हं आहेत. आगामी काळात या आंदोलनाला कोणतं वळण मिळतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा