मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा शाळांमध्ये शिकवण्याबाबत मत व्यक्त केले (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज (दि.18) देहूमधून होत आहे. यामुळे इंद्रायणीच्या काठी वैष्णवांचा मेळा जमला आहे. टाळ मृदंगाच्या निनादामध्ये आणि वारकऱ्यांच्या जल्लोषामध्ये देहूनगरी सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील देहूमध्ये उपस्थिती लावली. यावेळी वारकऱ्यांच्या वेषामध्ये आणि तुकाराम महाराजांची पगडी घालून अभंग म्हणताना मुख्यमंत्री फडणवीस दिसून आले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील देहूमध्ये येऊन वारकऱ्यांमध्ये तल्लीन झाले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदार होत आहे याचा मला आनंद आहे. एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराजांच्या यांच्या भेटीचा क्षण पुनर्निमित करण्यात आला आहे. त्या शिल्पाचे उद्घाटन केले. या संतपीठाच्या उद्घाटनाकरिता आलो आहे. आपला सांस्कृतिक ठेवा आणि पारंपरिक संताची वाणी या सर्व गोष्टी जगापर्यंत पोहचवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आता संत साहित्य हे सीबीएससी बोर्डामार्फत अनेक भाषांमध्ये शिकवलं जात आहे अशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे,” असे मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावर राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “यापूर्वी आपण हिंदी भाषा अनिवार्य केली होती. आता मात्र जीआर काढण्यात आला आहे त्यामध्ये अनिवार्य शब्द कुठेही नाही. आता कोणतीही तिसरी भारतीय भाषा शिकता येणार आहे. तीन भाषेचे सुत्र हे नवीन शैक्षणिक धोरण केलं आहे. त्यामध्ये एक मातृभाषा आहे जी मराठी आहे. उरलेल्या दोनमध्ये एक भारतीय भाषा असणे गरजेचे आहे. तर स्वाभाविकपणे इंग्रजी स्वीकारतात. त्यामुळे कोणतीही तिसरी भारतीय भाषा घेता येणार आहे,” अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “हिंदी भाषा पूर्वी अनिवार्य करण्यात आली होती कारण हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध होतात. आता मात्र आपण ती अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. कोणतीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. 20 विद्यार्थी असतील तर शिक्षक देखील दिले जातील. ऑनलाईन पद्धतीने देखील शिकवलं जाईल. त्यामुळे आजचा निर्णय हा तिसरी भाषा म्हणून हिंदी काढण्याचा आणि कोणतीही तिसरी भारतीय भाषा शिकण्याचा निर्णय घेतला आहे. आपण सर्व लोक इंग्रजी भाषेचा पुरस्कार करतो आणि हिंदी भाषेचा तिरस्कार करतो हे योग्य नाही. भारतीय भाषा या इंग्रजी पेक्षा चांगल्या आहेत. इंग्रजी ही व्यवहार भाषा झाली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाने मराठी भाषेला ज्ञानभाषा, अर्थिक भाषा आणि वैश्विक भाषा करण्याचा मार्ग खुला केला आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये शिकण्यास सुरुवात झाली आहे,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरेंसोबत चर्चा झाली…
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मराठी भाषेला पर्याय नाही. मराठी भाषा ही सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अनिवार्य असणार आहे. हिंदीला नक्कीच पर्याय आहेत. माझी राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजेत. तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, केंद्र सरकारने विचारपूर्वक एनइपीमध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे. जर देशभरामध्ये तीन भाषांचे सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. हा निर्णय देशासाठी आहे. तीन भाषां सूत्रांविरोधात तमिळनाडू कोर्टामध्ये गेले असून कोर्टानेही ते मान्य केलं नाही. देशातील एक अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट किंवा गैर आहे का? आपल्या मराठी भाषेला डावललं गेलं असतं तर वेगळी गोष्ट असली असती. मात्र आपली मुलं मराठी शिकत असताना आणखी एखादी भाषा शिकली तर हरकत नाही. त्यांना अधिकचे ज्ञान मिळेल,” असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या मागणीवर केले आहे..