फोटो - सोशल मीडिया
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. जनसन्मान यात्रेमधून ते विरोधकांवर निशाणा साधत आहे. तर आळंदी येथील कार्यक्रमातून अजित पवार यांनी महायुतीच्याच नेत्यांना दणका दिला आहे. “कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये” अशा सूचना अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. अजित पवार यांनी महायुतीमधील नेत्यांना धर्मांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला आहे. मध्यंतरी आमदार नितेश राणे यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केल्यामुळे अजित पवार यांचा राणेंना टोला असल्याचे बोलले जात आहे.
….समाजांमध्ये तेढ निर्माण करता
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आळंदीमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते, तेव्हा त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होते. हे होता कामा नये. तुम्हाला तुमच्या विचारधारा मांडायच्या असतील तर तुम्ही मांडू शकता. तुम्हाला त्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मत मांडायला हरकत नाही. परंतु, तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करता. समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगलं नाही,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता
पुढे ते म्हणाले की, “हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. अशी तेढ निर्माण करणारी वक्तव्य महाराष्ट्र कदापी खपवून घेणार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्या गोष्टींचा तीव्र विरोध करत राहील. कठोर शब्दांत आम्ही त्यांचा विरोध करू. तसेच अशा प्रकरणांमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असेल ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही,” अशी तंबी अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना दिली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केलीं होती. राणे यांनी मुस्लिम धर्मियांबाबतीत बदनामीकारक घोषणा दिल्याचे तक्रारीमध्ये सांगण्यात आले. विविध ठिकाणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता अजित पवार यांनी नेत्यांना सावध करत ताकीद दिली आहे.