डीसीएम एकनाथ शिंदे यांनी कोयना धरणावर बांधणाऱ्या तीन पुलांची पाहणी केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : मेढा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ तांब, ता. महाबळेश्वर येथे राहण्यासाठी आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुक्कामी दौऱ्यादरम्यान देखील आराम न करता स्थानिक समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील समस्या जाणून घेतल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी कोयना धरण (Koyna Dam) परिसराची पाहणी केली असून जनतेच्या हिताच्या कामांचा आढावा घेतला आहे.
कोयना धरण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर तीन पुल उभारण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नव्याने उभारण्यात येत असलेल्या तीन महत्त्वाच्या पुलांची पाहणी केली. या पाहणीमध्ये बामणोलीजवळील सावरीसोनाडी, आहीरतापोळा आणि तापोळा आपटी या तीन पुलांचा समावेश होता. हे पूल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे महत्त्वाचे दुवे ठरणार आहेत.यापैकी आहीर ते तापोळा हा पूल पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येत्या दोन महिन्यांत वाहतुकीसाठी हा पूल खुला होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे महाबळेश्वरहून तापोळा मार्गे थेट कोकणात जाणे सोपे होणार आहे.
हे देखील वाचा : आमदारांच्या डॉक्टर मुलीने वडिलांना जीवनदान दिले! DCM शिंदे म्हणाले, “अशी मुलगी केवळ नशिबानेच मिळते…”
सावरी सोनाडी हा पूल डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या पुलामुळे पुणे ते सातारा मार्गे कोकणाशी थेट संपर्क अधिक सक्षम होणार आहे. या तीन पुलांमुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज कमी होईल. तसेच या भागातच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. पुलांमुळे या भागातील पर्यटनात मोठी वाढ होणार असून रस्ते विकासालाही गती मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटन वाढीसाठी शासन प्रयत्नशील आहे. नवीन महाबळेश्वर या प्रकल्पामुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : “जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?






