Rohit Pawar News: ही कर्जमाफी नाही, तर कर्जवसुली योजना! कर्जमाफीवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप
गेल्या तीन-वर्षांपासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीकडून अपेक्षा होती, परंतु या सरकारने ज्याप्रमाणे 2017 मध्ये अटी-शर्ती लागू करून कर्जमाफीचा आत्माच काढून घेतला होता तसाच प्रकार यंदा देखील केला आहे. सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगत असले तरी सरकारने 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफीची अट टाकली आहे.
2019 च्या कर्जमाफीचे लाभार्थी शेतकरी 32 लाखाहून अधिक असून त्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजाराचा लाभ मिळणार आहे. शिवाय 2019 मध्ये लाभ घेतलेल्या आणि ज्यांची थकबाकी 50 हजारपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना वरची रक्कम आधी भरवी लागेल तरच त्यांना 50 हजाराचा लाभ मिळणार आहे. राज्यात 50 हजारपेक्षा कमी पिककर्ज असलेले शेतकरी 2-3 % असतील, सरासरी पीक कर्ज 1 लाख रुपयाच्या घरात आहे. म्हणजे 1 लाखाचे थकीत कर्ज असेल तर आधी 50 हजार भरा मग उरलेले 50 हजार आम्ही देऊ अशी ही योजना आहे. त्यामुळे ही कर्जमाफी नाही तर कर्जवसुली योजना आहे.
कर्जमाफी देण्यासाठी नियत लागते, तशी नियत 2008 आणि 2019 मध्ये सरकारने दाखवून कुठल्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी केली होती. परंतु दुर्दैवाने आजच्या सरकारकडे नियत नाही म्हणूनच 2017 प्रमाणे अटी-शर्ती टाकल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांची व्यथा समजून घेत तत्काळ या अटी-शर्ती काढून महाराष्ट्राला अपेक्षित अशी कर्जमाफी करावी अन्यथा रस्त्यावर उतरून या सरकारला या अन्यायकारक अटी-शर्ती काढायला भाग पाडू…!
गेल्या तीन-वर्षापासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीकडून अपेक्षा होती, परंतु या सरकारने ज्याप्रमाणे 2017 मध्ये अटी-शर्ती लागू करून कर्जमाफीचा आत्माच काढून घेतला होता तसाच प्रकार यंदा देखील केला आहे. सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ… — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2026
आपल्या ट्विटमधून ते म्हणाले, “भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला, याचा निर्णय प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच होईल! लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला, पण आज जवळपास ८० लाख महिलांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याच्या दाव्याकडेही शेतकरी संशयाने पाहत आहेत. या सरकारची पद्धतच घोषणा मोठी आणि लाभार्थी कमी अशी राहिली आहे. विविध अटी-शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे.”






