आदित्य ठाकरेंचे मुंबईत जाहीर आंदोलन; थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी (Photo Credit- X)
आदित्य ठाकरे यांनी परीक्षांमधील गोंधळ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “देशातल्या तरुण आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आज मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत. महाराष्ट्राचा अभिजित दिपके हा तरुण सध्या दिल्लीत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसला आहे. आम्ही सध्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. पण ही तर केवळ सुरुवात आहे; पुढे जाऊन आम्ही थेट या देशाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत.”
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी लडाखला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी नेहमीच शांततापूर्ण मार्गाने लढा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने लडाखच्या जनतेला तसे आश्वासनही दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर भाजपने लडाखच्या जनतेची फसवणूक केली. भाजपला लडाखची मौल्यवान जमीन उद्योगपती अदानी यांच्या घशात घालायची आहे आणि याच कारणामुळे वांगचुक यांच्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील जनतेने भाजपला देश बदलण्यासाठी आणि विकासासाठी बहुमत दिले होते. मात्र, हे लोक आता देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. ‘हर घर जल’, ‘स्मार्ट सिटी’, ‘प्रत्येकाला घर’ या भाजपच्या जुन्या घोषणा आता कुठे गायब झाल्या आहेत? असा सवाल त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले, “भाजप सरकार तरुणांच्या रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जनतेला धर्म आणि जातीच्या वादात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. जग पुढे जात असताना भाजप आपल्याला ५० वर्षांपूर्वी काय झाले, यात अडकवून नेहरू विरुद्ध सरदार पटेल असा भूतकाळातील वाद उकरून काढत आहे.”
देशातील बेरोजगारीच्या भीषण परिस्थितीवर बोट ठेवताना त्यांनी एका अहवालाचा दाखला दिला. “पुढच्या १० वर्षांत देशात १२० कोटी तरुणांना नोकऱ्यांची गरज भासणार आहे, मात्र सरकार केवळ ४० कोटी तरुणांनाच नोकऱ्या देऊ शकणार अशी स्थिती आहे. भाजपच्या नेत्यांची मुले परदेशात शिकायला आणि स्थायिक व्हायला जातील; मग आपल्या सर्वसामान्य मराठी आणि भारतीय तरुणांनी कुठे जायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. या जनविरोधी सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी आता देशात ‘आधी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि नंतर थेट प्रधानमंत्र्यांचा राजीनामा’ हा एकच नारा घुमणार, असा इशारा देत आदित्य ठाकरेंनी भाषणाचा समारोप केला.
Uddhav Thackeray Protest : उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा! आंदोलनावरून ठाकरे विरुद्ध सदावर्ते वाद






