काँग्रेसच्या चर्चासत्रात हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांशी बोलताना भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “देशातील आजची परिस्थीती पाहता आपल्याला सत्य व अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून सत्ताधारी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अरुणकुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “देश आज मुठभर लोकांच्या हातात गेला आहे, आपल्या गळ्याभोवती फास आवळला आहे. लढण्याची जिद्द कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील आजची परिस्थीती पाहता आपल्याला सत्य व अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे. चुकीचे काही घडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, “संपूर्ण मे महिना मी राज्यभर फिरून महत्वाच्या विषयावर आंदोलन केले. राज्यात फिरताना काही गोष्टी निदर्शनास आल्या, त्यात ५०० रुपयांच्या नोटा संपल्याचे चित्र आहे, बँकेत पैसे नाहीत. परिक्षा आहे पण पेपर लिक, डिग्री आहे पण नोकऱ्या नाहीत, अशी अवस्था आहे. शिक्षणाकडेही तरुण पाठ फिरवत आहेत. खरिपाचा हंगाम सुरु आहे पण शेतकरी नाराज आहे. शेतमालाला भाव नाही, खदखद वाढली आहे, परिस्थिती गंभीर आहे यातून मार्ग काढावा लागेल.जात व धर्म हे राजकीय विषय करण्यापेक्षा आर्थिक विषयावर राजकारण व्हावे,” अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली.
अर्थतज्ञ प्रा. अरूणकुमार यावेळी म्हणाले की, “मोदी सरकार जीडीपीचे आकडे लपवत आहे. देशातील असंघटीत क्षेत्र खूप मोठे आहे. छोटे, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नोटबंदीचा मोठा फटका MSME क्षेत्राला बसला. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्याचा फटकाही असंघटीत क्षेत्राला बसला. संघटीत क्षेत्राला मात्र त्याचा फायदा होत आहे. १० हजार रुपयांपेक्षा कमी कमाई असलेल्या कामगारांची संख्या असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या कमाईत व वाढलेल्या महागाईत तो कसा जगेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “महागाईचा दर सुद्धा संघटीत व असंघटीत क्षेत्रात वेगवेगळा आहे, गरिबांचे आकडे दाखविले जात नाहीत. गरिब माणूस पिचला जात आहे. आपले मार्केट घसरत आहे. आपली पिछेहाट होत आहे. तंत्रज्ञानात आपण मागे आहोत. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आपली गुंतवणूक अमेरिका, चीनच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आपली आयात वाढली आहे. अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकला आहे. आपली अर्थव्यवस्था तडजोडीची झाली आहे. शिक्षणवरचा आपला खर्च इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जागतिक पातळीवर आपण थट्टेचा विषय बनलो आहोत. संघटीत व असंघटीत क्षेत्रात मोठी तफावत आहे. कामगारांची संख्या कमी कमी होत आहे. यातून रोजगाराची समस्या वाढत आहे, काम मिळत नाही. शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही, यातून सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. सरकार खरे आकडे सांगत नाही. चुकीचे आकडे दाखवून दिशाभूल केली जात आहे. आरोग्य, शिक्षण क्षेत्रातही प्रगती नाही. २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले हा दावा चुकीचा आहे. लोकांच्या हातात पैसा असला तरच मागणी वाढेल,” असेही अरुणकुमार म्हणाले.






