जैन मुनी निलेश चंद्र यांचा संदीप देशपांडेंना इशारा
घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन कुटुंबीयांनी कोणाचीही परवानगी न घेता येण्याजाण्याच्या मार्गावर पांढरी पट्टी मारली होती. यावरून प्रसिद्ध रिल्सस्टार प्रासाद वेदपाठक याने प्रश्न उपस्थित करून आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली होती. यावरून मोठा गदारोळ निर्माण होत राज्यात विविध प्रतिक्रिया येत होत्या. आता हा वाद राजकीय स्तरावर पोहोचला असून यात मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावरून महापालिकेला थेट इशारा दिला आहे. त्यातच आता संदीप देशपांडेंच्या भूमिकेवर विरोध दर्शवत जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून “जैन समाज शांतताप्रिय असला याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता हा वाद आणखी उफाळण्याची चिन्हे आहेत.
रिल्सस्टार प्रसाद वेदपाठक यांच्या व्हिडियोंनंतर या विषयावरून राज्यभर चर्चा सुरु झाल्या. यानंतर मनसेने या वादात उडी घेतली. मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. दादर पश्चिम येथील डीएस बावरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारल्याने संदीप देशपांडे यांनी आक्षेप घेतला. बावरेकर मार्गावरील जैन मंदिरालगत मारण्यात आलेल्या या पट्ट्यांवरून संदीप देशपांडे यांनी महानगरपालिकेला इशारा दिला होता. त्यावरून आता जैन मुनी निलेश चंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जैन मुनी निलेशचंद्र यांनी यावरून संदीप देशपांडे यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. ते यावेळी म्हणाले, “संदीप देशपांडे दोन समाजांमध्ये दरी निर्माण करत आहेत. जैन समाज शांतताप्रिय आहे. याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत. पण, जैन समाजाला मी आव्हान करतो कि, तुम्ही शांतता राखा, जास्त विरोध करू नका.”
ते पुढे म्हणाले, “संदीप देशपांडे जर बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जात असतील तर बाळासाहेब ठाकरे यांनी जैन, मारवाडी लोकांवर प्रेम केलं, त्यांनी कुठलाही त्रास दिला नाही,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘संदीप देशपांडे जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुम्ही मुंब्रा, भेंडी बाजार, पायधुणीला जा. तिथे ज्याप्रकारे ईदच्या दिवशी किंवा नमाज पढताना रस्त्यावर पांढरे घालून बसतात त्याला विरोध करा. मुंब्रामध्ये एमआयएमची नगरसेविका म्हणते मुंब्रा हरा कर दूंगी त्याला तुम्ही विरोध करा. तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका,” असे ते यावेळी म्हणाले.






