काँग्रेसला साथ देणारे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती (फोटो - सोशल मीड़िया)
कराड : कितीही मोठे संकट आले तरीही कोणत्याही आमिषाला, दबाव आणि दडपणाला बळी न पडता काँग्रेसला साथ देणारे नामदेव पाटील यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती आहे. असे कार्यकर्ते पक्षासोबत असल्याने काँग्रेस येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा आणि कराड तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे होते. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, अजितराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेदेखील वाचा : Samruddhi Highway : एकनाथ शिंदेंनी घेतलं हातात स्टेरिंग; समृद्धी महामार्गावरुन महायुतीची गाडी सुसाट
नामदेव पाटील म्हणाले, ‘पंचायत समितीचे सदस्य म्हणून पक्षाने संधी दिल्यानंतर आपण मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली. कोरोना काळातही गावोगावी ऑक्सिजन मशीनचे वाटप करुन लोकांना केलेली मदत लोक कधीही विसरणार नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व हीच आपली सर्वात मोठी शक्ती असून येणाऱ्या जि. प., पंचायत समिती निवडणुकीत वारुंजी गट काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवेल’.
तसेच विधानसभेतील बाबांचा पराभव धक्कादायक होता, तो कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कराड दक्षिणमधील जनता पुन्हा काँग्रेसला साथ देईल. काँग्रेस हा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सर्वधर्मसमभाव या तत्त्वाने चालणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेदेखील वाचा : पाचगणीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाला धक्का; रामवाडी सरपंचासह ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश