राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची अट घातली होती. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मागणीला स्पष्ट नकार दिल्याचे समजते. दिल्लीतून या अटीला 'रेड सिग्नल' मिळाल्यानंतर भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यास अनास्था दर्शवली.
Rajysabha Election: महायुतीत मोठे नाट्य! छगन भुजबळांची 'ती' अट दिल्ली भाजप श्रेष्ठींनी फेटाळली
Follow Us:
Follow Us:
विस्तार
Rajysabha Election: राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विधान परिषदेच्या तोंडावर महायुतीत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत नाट्यमय घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असताना, त्यांच्या एका अटीमुळे संपूर्ण समीकरण बदलल्याचे सांगितले जात आहे. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ यांनी घातलेली अट दिल्ली भाजप श्रेष्ठींनी फेटाळून लावल्यामुळे हे नाराजी नाट्य रंगल्याचे बोलले जात आहे.
नेमके काय घडले?
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून खलबतं सुरू आहे. त्यातच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चितही झाली होती. छगन भुजबळ हे स्वतः राज्यसभेसाठी उत्सुक होते. पण छगन भुजबळांनी पक्षासमोर आणि भाजप श्रेष्ठींसमोर एक महत्त्वाची अट ठेवली. ते राज्य सभेत गेले तर विधानसभेतील त्यांच्या रिक्त जागी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना संधी दिली जावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे बोलले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची अट घातली होती. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मागणीला स्पष्ट नकार दिल्याचे समजते. दिल्लीतून या अटीला ‘रेड सिग्नल’ मिळाल्यानंतर भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यास अनास्था दर्शवली. या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उशिरापर्यंत बैठका झाल्या. भुजबळ यांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर पक्ष नेतृत्वाने पर्यायी नावांवर चर्चा केली. अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर एकमत होत त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
भुजबळांची नाराजी वाढणार?
राज्यसभेची संधी हुकल्याने आणि समीर भुजबळ यांनाही मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांच्यात नाराजी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही नाशिक मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होती. मात्र अंतिम टप्प्यात त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आले होते.
आता राज्यसभा निवडणुकीतही त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने भुजबळांची नाराजी आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या भूमिकेबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या नाराजीमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर आणि ओबीसी राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Title: Maharashtra politics bjp high command rejects chhagan bhujbals condition