LPG Gas दरवाढीवरून शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
गेल्या काही दिवसांपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभारत इंधन तुटवडा आणि दरवाढ करण्यात आली होती. त्यातच आता महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक फटका बसला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG) सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर आज ७ जूनपासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर, दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत ₹९१३ वरून ₹९४२ होणार आहे. यावरून आता राजकीय नेत्यांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.
अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभारत इंधन तुटवडा आणि दरवाढ करण्यात आली होती. आता याचा फटका घरगुती LPG सिलेंडरवरदेखील पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही LPG गॅसवरील दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी प्रति सिलेंडर ६० रुपयांची दरवाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ केली गेली आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मार्चमध्ये ६० रुपयांची दरवाढ होऊनही, तेल विपणन कंपन्यांना घरगुती एलपीजी विक्रीतून तोटा होत होता. या दरवाढीपूर्वी, सरकारी तेल कंपन्यांना प्रत्येक घरगुती LPG सिलेंडरमागे अंदाजे ७०३ रुपयांचा तोटा होत होता. त्यामुळे, वाढता खर्च लक्षात घेता, दरवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, दरवाढ केल्याचे सांगण्यात आले.
शरद पवार यांनी गॅस दरवाढीवरून प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “सातत्याने हे दर वाढवत आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं होतं. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल,” असे ते यावेळी म्हणाले.
Free Ration Scheme : 63 लाख नागरिकांचे मोफत रेशन थांबणार? ‘या’ सरकारच्या निर्णयाने मोठी खळबळ
यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील एकही देश असा नाही, जिथे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले नाही. इंधनाचे दर सगळीकडे वाढलेले आहेत. निश्चितपणे, केंद्र सरकार त्याची चिंता करत आहे. यापूर्वीही जागा इंधनाचे दर वाढल्यावरच देशात दर वाढले आहेत आणि कमी झाल्यावर कमीही झाले आहेत. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय होईल,” असे ते यावेळी म्हणाले.






