ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील गटाला धक्का; भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश
कराड : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेते-पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पक्षबदल केले जात आहेत. असे असताना आता तासवडे विकास सेवा सोसायटीचे पॅनल प्रमुख संजय जाधव यांच्यासह चेअरमन आणि सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते झालेल्या या पक्षप्रवेशामुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश उंब्रज गटातील आमदार मनोज घोरपडे यांची राजकीय ताकद अधिक दृढ करणारा ठरला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा कल भाजपाकडे होत असून, कराड उत्तरमध्ये तर पक्षप्रवेशाची लाट दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Session: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; सरकारकडून कोणत्या घोषणा होणार?
दरम्यान, गेल्या एका वर्षात आमदार घोरपडे यांनी केलेल्या विकासकामांचा वेग, सर्वसामान्यांशी साधलेला थेट संवाद आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे अनेक कार्यकर्ते प्रभावित झाले असल्याचे दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणून तासवडे सोसायटीचा संपूर्ण पॅनल भाजपमध्ये दाखल झाला.
यावेळी पॅनल प्रमुख नथुराम पाटील, चेअरमन शहाजी पाटील, संभाजी जाधव, युवराज जाधव, माजी चेअरमन विश्वनाथ जाधव, माजी चेअरमन धर्मेंद्र जाधव, शंकर जाधव, तानाजी चव्हाण, भगवान खरात यांच्यासह मोठ्या संख्येने संचालक व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
विकासाची कोणतीही कमतरता भासू देणार नाही
कार्यक्रमात बोलताना आमदार घोरपडे यांनी भाजपमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. आपल्या गावातील जुने सहकारी आणि नव्याने प्रवेश करणाऱ्यांना योग्य मान-सन्मान देत कामाचा वेग अधिक वाढवू, असे सांगितले. तासवडे परिसरातील या भव्य पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेदेखील वाचा : Nanded News: नांदेडमध्ये आदिवासी कुटुंबावर दबावाचा आरोप; आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशीची मागणी






