पालकमंत्र्यांची नाराजी काय निघाला तोडगा
राज्य सरकारतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्याच्या निर्णयानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. रविवारी दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्हयाच्या पालकमंत्रीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नुकताच यातून तोडगा काढण्यात आला असल्याचा यासंदर्भातील शासन निर्णय रविवारी सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केला आहे.
“पहाटेची शपथ घेऊ नका असं मी दादांना सांगितलं होतं…”; धनंजय मुंडे पक्षाच्या शिबिरात काय बोलले?
पालकमंत्रीपदाची धुरा नक्की कोणाकडे?
भरत गोगावले यांना याठिकाणी पालकमंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र गोगावले यांना डावलून पुन्हा आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात आले. त्यामुळे गोगावले यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामेही दिले. तर, दुसरीकडे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नाव नाशिकचे पालकमंत्री म्हणून घेतले जात होते. शिंदे गटातील या ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून नाशिकच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. यावरून शिंदे गटात मोठी नाराजी निर्माण झाली होती.
राज्य मंत्रीमंडळाच्या नव्या पालकमंत्री पदाची घोषणा शनिवारी करण्यात आली होती. यात बहुचर्चित रायगडच्या पालक मंत्री पदाची धुरा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे तर नाशिकचे पालकमंत्री पद गिरीष महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले होते. एकीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गटाचा आग्रह होता.
महायुतीमध्ये मात्र नाराजी
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पालकमंत्री पदांच्या नियुक्त्यांचा निर्णय जारी झाला. मुख्यमंत्री परदेशात असले तरी महायुतीतील नाराजी वाढल्याचे चित्र आहे. पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी आणि नाशिक जिल्ह्यात भाजप विरूद्ध शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे.
अखेर यावर तोडगा म्हणून रविवारी रात्री या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्ती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची निवड होते, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर असल्याने यासंदर्भातील निर्णय केव्हा जाहीर केला जातो, याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे.