बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी दिल्यामुळे पार्थ पवार यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली (फोटो - सोशल मीडिया)
Baramati by election : बारामती : दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अजित पवारांनंतर बारामतीचा दादा कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली. मात्र अजित पवारांच्या अपघाती निधानमुळे बारामतीची निवडणूक (Baramati by election) बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. घरातील सदस्याचे निधन झाल्यामुळे शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष आकाश मोरे यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. यावर खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
महायुतीने काँग्रेसकडे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची विनंत केली. मात्र काँग्रेस पक्षाने नकार देत उमेदवार जाहीर केला. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसने उमेदवार मैदानामध्ये उतरुन निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. यानंतर अजित पवार यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
हे देखील वाचा : वर्धापनदिनी PM मोदींनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ खास कानमंत्र; 2047 ला केले लक्ष्य
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल,” अशा शब्दांत पार्थ पवार यांनी त्यांचा रोष स्पष्ट शब्दांत व्यक्त केला.
हे देखील वाचा : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद
पुढे ते म्हणाले की, “लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे. म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय अवस्था आहे,” अशी टीका पार्थ पवार यांनी केली आहे.






