भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर बंदी आणण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी आहे (फोटो - सोशल मीडिया)
India vs Pakistan : मुंबई : आशिया कप 2025 चे सामने सुरु असून यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होणार आहे. पहलगाम हल्ल्यामुळे हा सामना होऊ नये अशी विरोधकांकडून जोरदार मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर देखील भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे या पाक विरुद्ध भारताच्या सामन्याला नकार दिला जात आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर देखील निषेध दर्शवला आहे. खासदार राऊत म्हणाले की, भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांसह भाजप सरकारने परवानगी देणं ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगामचा हल्ला, त्यात २६ निरपराध लोक आणि त्यांच्या स्त्रियांचे सिंदूर पुसले गेले, यावर मोदींनी जो राजकीय छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता, त्याचं काय झालं. भाजपची राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“जय शाह यांचा इंटरेस्ट हा भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये गुंतलेला आहे. जय शाह हे दुबईत आहेत पण ते आजच्या सामन्याला जाणार नाही, हे कितीतरी मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. तुम्ही सामना आयोजित केलेला आहे. तुम्ही प्रमुख आहात. नरेंद्र मोदी यांना राष्ट्रभक्तीबद्दल कोणतीही नैतिकता राहिलेली नाही आणि त्यांच्या अंधभक्तांनाही. बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते है, पण भारत -पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवू शकत नाही. रशिया युक्रेनचे वाद थांबवू शकता. ट्रम्पच्या दबावापोटी भारत पाकिस्तान यांच्यातील वॉरही ते थांबवू शकतात. पण भारत -पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवू शकत नाही, अशी काय मजबुरी आहे. असा कोणता पैशाचा खेळ यात आहे,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खेळाला खेळाच्या नजरेतून बघावे. सत्ताधारी पक्षांच्या विरोधात भूमिका घेण्याचे निमित्त विरोधक शोधत असतात, असा टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार हे अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा करत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकांची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमूखी पडलेल्यांमध्य़े एकही तुमच्या घरातील कोणी असतं तर तुम्ही हेच बोलले असते का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.