राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने 'हा' नाराज नेता सोडणार काँग्रेसचा 'हात'? शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता (संग्रहित फोटो)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुण्यातील काँग्रेस नेते आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. रोहित टिळक हे टिळक कुटुंबातील राजकीय वारसा असलेले नेते म्हणून ओळखले जातात. लवकरच ते काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना टिळक म्हणाले, 3 वर्षांपूर्वी त्यांच्या संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचा टिळक पुरस्कार देण्यात आला होता. त्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाने काहीसे अंतर ठेवण्यास सुरुवात केली. या संदर्भात आपण अनेकदा काँग्रेस हायकमांडपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. यादरम्यान माझी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक चर्चा झाली.
एकनाथ शिंदे यांच्यात सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता दिसतो. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करायचा हे निश्चित झाले. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी मला राज्यसभेची उमेदवारीही देऊ केली होती. पण महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान, शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा आणि त्यांचा टिळक कुटुंबाशी असलेल्या स्नेहाचा विचार करून आपण राज्यसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतली. राज्यसभेसाठी आपण अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आता राज्यसभा हुकल्यानंतर रोहित टिळक यांना एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची संधी मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
अनेक निवडणुका पार पडल्या
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 जागांसाठी नेमके सातच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज राहिलेली नाही. बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश आहे.






