कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी; सिद्धरामय्या आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच कर्नाटकमधील नेतृत्त्व बदलाचा विषय शांततेच्या मार्गाने सोडवण्यात काँग्रेस हायकमांडला यश आले आहे. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत असले, तरी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज सकाळी ११ वाजता राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली जात आहे.
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांच्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांना काँग्रेस पंतप्रधानपदाचा चेहरा बनवू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त होत आहेत. यातील एका जागेवरून सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर आणले जाईल. एवढेच नव्हे तर, पक्षाचा एक प्रमुख ‘ओबीसी चेहरा’ म्हणून आगामी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस त्यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सादर करेल. राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत सिद्धरामय्या यांना हा शब्द देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, दिल्लीच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नेतृत्त्व बदलाशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले. बुधवारी त्यांनी फक्त एकच वाक्य उच्चारले, “मी या विषयावर उद्या बोलेन”. आज, गुरुवारी सकाळी ते आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत ‘ब्रेकफास्ट मीटिंग’ करणार असून, त्यानंतर ते स्वतः आपल्या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात चार उपमुख्यमंत्री असणार
नव्या सरकारमध्ये ४ उपमुख्यमंत्री असतील. सरकारमध्ये मागासवर्गीय, ओबीसी, लिंगायत, अल्पसंख्याक या गटातून प्रत्येकी एक चेहरा उपमुख्यमंत्री बनवला जाण्याची शक्यता आहे. संभाव्य उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दलित कोट्यातून जी. परमेश्वर आणि प्रियांक खर्गे, ओबीसी कोट्यातून यतींद्र सिद्धरामय्या, लिंगायत कोट्यातून एम. बी पाटील आणि ईश्वर खंड्रे, अल्पसंख्याक कोट्यातून केजे जॉर्ज, यूटी खादर आणि जमीर यांची नावे चर्चेत आहेत.
राजकारणात भूकंप ! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?






