सतेज पाटलांविरोधात कार्यकर्त्यांचेच बॅनर
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुणे आणि कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याविरोधात चक्क पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आक्रमक पवित्रा घेतला असून, पुण्यात ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात थेट आणि बोचरे बॅनर्स लावले आहेत.
‘कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला, कोल्हापुरात हारला आणि पुण्यातही पक्ष सपाट केला’, अशा आशयाचे हे मजकूर असलेले बॅनर्स सध्या सोशल मीडियासह दोन्ही जिल्ह्यांमध्ये चर्चेचा मोठा विषय बनले आहेत. पुण्यातील चौकांमध्ये लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर काँग्रेस कार्यकर्त्यांची उघड नाराजी दिसून येत आहे. या बॅनर्सवर लिहिले आहे, ‘कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला. कोल्हापुरात स्वतः हारला आणि पुण्यातही पक्ष सपाट केला’, हे बॅनर्स कुण्या विरोधकांनी नव्हे, तर काँग्रेसच्याच नाराज कार्यकर्त्यांच्या नावाने लावण्यात आल्याचा दावा केला जात असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली.
दरम्यान, सतेज पाटील यांच्यासारख्या वजनदार नेत्यावर पुण्यात येऊन अशी टीका होण्याची अनेक कारणे आहेत. काँग्रेस पक्षाने सतेज पाटील यांच्यावर पुणे परिसरातील निवडणुका आणि पक्षीय समन्वयाची मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुण्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आलेले नाही.
पुण्यात पक्ष सपाट?
पुण्यात पक्ष ‘सपाट’ झाल्याचा थेट दोष आता त्यांच्या रणनीतीवर ठेवला जात आहे. पुणे काँग्रेसमध्ये स्थानिक विरुद्ध उपरे असा वाद आहे. पुण्याचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते असताना कोल्हापूरच्या नेत्याला पुण्यात निर्णय प्रक्रियेत जास्त महत्त्व दिले गेल्याची भावना पुण्यातील एका गटात होती. हीच नाराजी या बॅनर्सच्या माध्यमातून बाहेर आल्याचे बोलले जात आहे.
पुणे-कोल्हापुरात चर्चा
बॅनरबाजीमुळे पुण्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये शांतता असली, तरी अंतर्गत पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. तिकडे कोल्हापुरातही सतेज पाटील यांच्या समर्थकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला या बॅनरबाजीमुळे आता कोणते नवीन वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप आमदार सतेज पाटील किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.






