'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी'; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. सातत्याने रंगणाऱ्या या चर्चांवरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल शैलीत नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी राजकीय अफवांवर उपरोधिक भाष्य केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांच्या आठ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप असून त्यात रोज माध्यमांमध्ये सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर विनोद केला जातो. त्या म्हणाल्या, “आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवले जाते. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय. आम्हाला कमोडिटी करून ठेवलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार इंटरनॅशनल करून टाका, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करतो असेही सांगा.” त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर-3’ राबविण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही आमदार आणि खासदारांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकप्रतिनिधींशी संपर्क सुरू असल्याचा दावा केला जात आहे.
Dhairyashil Mohite यांची कथित Audio Clip Viral; धमकीच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
शिंदे गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटातील दहा आमदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू असून पक्षांतरबंदी कायद्याचे गणित जुळवण्यासाठी आणखी काही आमदारांशीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, ठाकरे गटातील आणखी एका खासदाराशी संपर्क साधल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांबाबत संबंधित पक्षांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
बुधवारी विधान भवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळासाठी बैठक सोडून शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. मात्र या चर्चेचा नेमका विषय अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
माहितीनुसार, शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. बैठकीत आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच आता मात्र तालुका लेव्हलवर ते एकत्र आले आहेत. अहिल्यानंगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवार गट एकत्र आले असून कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड झाली आहे.
नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्यावर अविश्वास ठराव करण्यात येणार होता. पण त्यापूर्वीच त्यांनी आपला राजीनामा दिला. रोहिणी घुले यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपचे राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार एकत्र आले. यामुळे कर्जत नगर पंचायतीवर राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहणार आहे. कर्जत – जामखेडच्या राजकारणात राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांचे विरोधक मानले जातात. रोहित पवारांनी दोनदा रामशिंदेंचा पराभव केला आहे. परंतु आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार दोन्ही राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.






