महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे जाणार विधान परिषदेवर; काँग्रेसह राष्ट्रवादीचाही पाठिंबा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून, उद्धव ठाकरे लढणार असतील, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, लढणार नसतील, तर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांना समन्वयाने चर्चा करावी लागेल. तसेच राज्यसभेच्या पुढील जागांबाबतही आताच स्पष्टता आवश्यक असल्याचे नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढावी, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचा अनुभव राज्य आणि परिषदेला उपयोगी ठरेल, असे त्या म्हणाल्या.
निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार १२ मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी निकाल आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला ८ जागांवर आघाडी मिळण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीला एकच जागा मिळू शकते. त्यामुळे या एका जागेसाठी उमेदवार निश्चितीकडे सर्वांचे लक्ष आहे.
निवडणुकांचे बिगूल वाजले
महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगूल वाजला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 9 सदस्य हे निवृत्त होणार आहेत. पुन्हा एकदा निवडणूका जाहीर झाल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये (Political News) हालचालींना वेग आला आहे. निवृत्त होणाऱ्या किती नेत्यांना पुन्हा संधी दिली असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार?
विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोऱ्हे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजीतसिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, शशिकांत शिंदे आणि संजय केनेकर यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांमध्ये कोणत्या नेत्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळणार आणि कोणत्या नेत्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी दिली जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.






