File Photo : Vinod Tawde
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. पण, महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. बहुमताचा आकडा पार केल्याने महायुतीकडून आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असताना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील आणखी एका बड्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी मिळणार आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! राज्यात आज होणार सरकार स्थापन; शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण, तब्बल 4 हजार जवान…
भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशसारख्या राज्याची जबाबदारी देण्यात आल्याने ही शक्यता आणखी बळकट झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या जानेवारीमध्ये निवडले जाणार आहेत. अलीकडील काही घडामोडींवरून विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तावडे यांची प्रमोद महाजन यांच्या पद्धतीने काम करणारा नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
विरोधी पक्षांतील नेत्यांनाही सोबत ठेवण्याचे त्यांचे कौशल्य हे पक्षासाठी उपयोगी ठरणार असल्याने राष्ट्रीय अध्यक्षाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. विनोद तावडे हे यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारचे प्रभारी आहेत. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत व्यवस्थित समन्वय राखतानाच भाजपाचा आक्रमक चेहरा कायम ठेवेल. या माध्यमातून भाजपला जमिनीवर राहून अधिक सक्रिय ठेवेल, अशाच नेत्याची गरज वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केली आहे.
विनोद तावडे हे एक कुशल व्यक्तिमत्व
विनोद तावडे हे एक कुशल आणि पार्टीशी समर्पित व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तरीही पक्षाप्रती समर्पित राहून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही तावडे यांना ओळखले जाते. त्यांच्या विरोधकांच्या सर्व प्रयत्नांवर त्यांनी पाणी फेरले आणि पक्षात केंद्रीय पातळीवर स्थान मिळविले. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत भाजपाचे कार्य त्यांनी केले. बिहारमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी जमीनीवरील कामगिरी त्यांनी केली.
हेदेखील वाचा : Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द हटवले जाणार नाहीत