मतगोंधळात कौल यंत्रबंद
मुंबई : पुणे, नाशिक, नागपूर, मुंबईसह 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. राज्यातील अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आज महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील. यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अनेक भागांतील निकाल हळूहळू समोर येतील.
मुंबईसह राज्यातील बहुतेक सर्वच महापालिका क्षेत्रातून मतदारांकडून तक्रारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. बोटावरील शाई पुसली जात आहे, यामुळे बोगस मतदान वाढण्याची भीती शिंदेसेनेच्या मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी केली. त्यासोबतच मतदान यंत्रावर फक्त भाजपाचे बटण दाबले जात आहे, इतर बटण दाबले जात नसल्याचीही तक्रार मतदारांनी केली. पण, आता मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या मतमोजणीबाबत कोणती कार्यपद्धती वापरायची याचा निर्णय महापालिका आयुक्त घेतील. पण कोणतीही कार्यपद्धती वापरली तरी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणत्याही स्थितीत निकाल स्पष्ट होतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हेदेखील वाचा : Ashish Shelar: ‘राज ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीत आपला पराभव स्वीकारला आहे’, भाजप नेते शेलार यांचा दावा
पुणे महानगरपालिकेच्या १६३ जागांसाठी काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून, शहरात एकूण ५२.४२ टक्के मतदान झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीत ५५.५६ टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का ३.५० टक्क्यांनी घसरला आहे.
अनेक ठिकाणी नवी समीकरणे
या निवडणुकांमध्ये राज्यात अनेक नवी समीकरणे पाहायला मिळाली. युत्या आणि आघाड्यांच्या खिचडीमुळे मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधील निकालांचा परिणाम राज्याच्या आगामी राजकारणावर होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात भाजप-सेनेची सत्ता?
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कोल्हापुरात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापुरात भाजप आणि शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूर शहरात भाजप मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरताना दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : Municipal Election Result 2026: …अन् मतदानाचा दिवस ठरला शेवटचा! मतदानाचा हक्क बजावतना मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू






