दरवर्षीप्रमाणे यावेळीही भगवान जगन्नाथांची रथयात्रा ओडिशातील पुरी येथे सुरू होणार आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा आयोजित केली जाते. या काळात भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर विराजमान असतात. यावर्षी २७ जून २०२५ रोजी हे जगन्नाथ यात्रा सुरु होणार आहे.
26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…
जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील सर्वात प्रमुख आणि विशेष उत्सवांपैकी एक मानली जाते, ज्याला रथ महोत्सव आणि श्री गुंडीचा यात्रा असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रा मोठ्या थाटामाटात काढली जाते. यावर्षी जगन्नाथ रथयात्रा शुक्रवार, 27 जूनपासून सुरू होईल.
पुरीचे जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे, जे एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. या काळात भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर बसतात. जगन्नाथ रथयात्रेचे विशेष महत्त्व आहे, जगभरातून भक्त या पवित्र यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात. भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत सहभागी होऊन रथ ओढल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते.
जगन्नाथ रथ यात्रेची तिथी काय?
हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस २६ जून रोजी दुपारी १:२४ वाजता सुरू होईल आणि २७ जून रोजी सकाळी ११:१९ वाजता संपेल. जगन्नाथ रथयात्रा ५ जुलै २०२५ रोजी संपेल. ही रथ यात्रा ९ दिवस चालेल.
छेराचा विधी काय आहे?
भगवान जगन्नाथाची रथयात्रा पुरीतील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होईल आणि गुंडीचा मंदिरापर्यंत जाईल. या यात्रेच्या पहिल्या दिवशी छेराचा विधी केला जातो. पण, छेराचा विधी काय आहे?
प्राचीन काळापासून एक परंपरा चालत आली आहे ज्यामध्ये ओरिसाचे महाराज सोन्याच्या झाडूने रथ स्वच्छ करतात. या सोन्याच्या झाडूने रथ स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला छेरा विधी म्हणतात आणि त्यानंतर रथयात्रा सुरू होते आणि भक्त भगवानांचा रथ ओढतात. त्यानंतर, १ जुलै रोजी हेरा पंचमी विधी केला जाईल. ४ जुलै रोजी रथयात्रा गुंडीचा मंदिरापासून भगवान जगन्नाथाच्या मुख्य मंदिरापर्यंत जाईल ज्याला बहुदा म्हणतात. त्यानंतर, ५ जुलै रोजी भगवान जगन्नाथ मुख्य मंदिरात परत येतील, जिथे त्यांचे भव्य स्वागत केले जाईल.
रथयात्रा का काढली जाते?
स्कंद पुराणानुसार, भगवान जगन्नाथाची बहीण सुभद्रा यांनी एके दिवशी शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जगन्नाथ आणि बलभद्र त्यांच्या बहिणीला रथावर बसवून शहर दाखवण्यासाठी निघाले. या प्रवासादरम्यान, ते त्यांच्या मामी गुंडीचाच्या घरी गेले आणि तिथे सात दिवस राहिले. तेव्हापासून जगन्नाथ रथयात्रेची परंपरा सुरू झाली.